बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळामध्ये फेरबदल होणार असून काल रात्री अचानक विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे बारामती अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट, तज्ञ संचालक प्रीतम पहाडे व श्रीनिवास बहुळकर यांनी आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची शहरात आज चर्चा होती.
बारामती अर्बन बँकेमध्ये काम करत असताना सध्याच्या संचालक मंडळाने अधिकाधिक कर्ज वसुली करून बँक नफ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्याची चर्चा शहरात सुरू असतानाच अजित पवार यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्द केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात देखील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
बारामती सहकारी बँकेने या आर्थिक वर्षात 53 कोटींचा ढोबळ नफा मिळवला असून निव्वळ नफा आठ कोटी रुपयांचा मिळवला आहे. त्याचे कौतुकही काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केले होते. सचिन सातव यांनी बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि संचालक मंडळाने घेतलेले काही कठोर निर्णय यामुळे बारामती सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती चांगल्या स्थितीवर आल्याने त्याची देखील चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती.
दरम्यान ही राजीनामे म्हणजे दोन नव्याने तज्ञ संचालक घेण्याबरोबरच उपाध्यक्ष पदाची नव्याने फेरनिवड करण्याची देखील प्रक्रिया असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज होती.