विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
मोरगाव – निरा रस्त्यावर ७ दिवसांपूर्वीच चारचाकी गाडी अडवून गाडीतून उतरवून चाकू व कोयत्याचा धाक दाखवून ८ लाख लुटलेल्या तिघांच्या टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मोहित भिकुलाल भंडारी, अमोल विठ्ठल कुमावत (रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), इप्ताकर नईम शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ लाखांपैकी १ लाख रुपये जप्त केले आहेत.
ही घटना ३० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. मोहम्मद अब्दूल रहिम कुरेशी हे कापडाच्या खरेदीसाठी निघाले होते. तेव्हा त्यांच्या पीकअप जीपला चारचाकी आडवी लावून जीपमधून कुरेशी यांना उतरवून तिघांनी ८ लाख ७ हजार रुपये लुटले व मोबाईल फोनही चोरून नेला.
या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके तयार करून तपासाला सुरवात केली.
या तपासादरम्यान चोरून नेलेला मोबाईल फोन, तांत्रिक तपास व पोलिसांच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हा गुन्हा संभाजीनगर मधील तिघांनी केल्याचा पोलिसांचा संशय गडद झाला. त्यांनी संभाजीनगर येथे जाऊन वरील तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख रुपये हस्तगत केले.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक राहूल गावडे, सचिन काळे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, राजू मोमीन, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, आसिफ शेख, सहायक फौजदार काशिनाथ राजपुरे, हवालदार मारकड, दरेकर यांच्या पथकाने केली.