दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई नगरपरिषदेमार्फत प्रायोगिक तत्वावर ३ सामुदायिक शौचालये व ३ सार्वजनिक शौचालयामध्ये मासिक पाळीशी संबंधित स्वच्छता व्यवस्थापनाकरीता सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन व इन्सीनरेटर मशीन बसविणेत आली असून या सर्व मशिनच्या दुरुस्तीचे काम नगरपरिषदेमार्फत केले जात आहे.
या मशीनच्या देखभालीसाठी शहरातील दोन महिला बचत गट हे काम सांभाळत आहेत. घरगुती किंवा इतर कामे सांभाळून महिलांना या मशीनच्या देखभालीचे काम करता येत आहे. या आणि अशा महिलांनी राबविलेल्या विविध प्रेरणादायी स्वच्छताविषयक उपक्रमांची दखल घेऊन केंद्र सरकारने पहिल्या WINS पुरस्काराची घोषणा केलेली आहे. या पुरस्कारासाठी वाई नगरपरिषदेने आपल्या या महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
वेंडींग मशीनमध्ये वेळच्यावेळी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महिला बचत गटांची असून हे बचत गट सॅनिटरी नॅपकिन खाजगी व्यापाऱ्याकडून विकत घेऊन उपलब्ध करून देत आहेत. सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन व इन्सीनरेटर मशीन वापरण्यासाठीचे योग्य ते प्रशिक्षण नगरपरिषदेमार्फत बचत गटांना देण्यात आले आहे.
या मशीन्स पर्यावरणपूरक असून जास्तीत जास्त महिलांनी या सुविधांचा लाभ घ्यावा याबाबत शहरामध्ये नगरपरिषद व बचतगटांमार्फत जनजागृती देखील करण्यात आली आहे. नगरपरिषेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गरजू महिलांना रोजगार मिळून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
सदर काम महिलांच्या आरोग्याबाबत असल्याने महिला बचतगट हा या कामासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. वाई नगरपरिषेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
किरणकुमार मोरे, प्रशासक – या उपक्रमामुळे बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होत असून सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम देखील कमी होण्यास मदत होत आहे. या उपक्रमाला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद बघून आणखी ११ सार्वजनिक शौचालयामध्ये देखील हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.