महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बेजाबाबदारपणामुळे बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील शेतकऱ्याचा मृत्यू.
बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे काल दुपारी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील शेतकऱ्याला वीजेच्या खांबावर चढायला सांगून दुरुस्ती करायला लावली. मात्र वीजेचा धक्का बसून या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
या घटनेने तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्विकारणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी स्विकारल्याने मंगळवारी रात्री उशीरापर्यंत तणावाची स्थिती होती. दरम्यान आज (ता.५) पहाटे दोनच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विजय मुरलीधर गवळी असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना विद्युत खांबावर चढता येत होते. म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दुरुस्ती करण्यास सांगितले. परंतु याच दरम्यान खांबावर चढलेल्या गवळी यांना यामध्ये विजेचा धक्का बसला आणि यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर उंडवडी सुपे येथील शेतकरी व नातेवाईक आक्रमक झाले. जोपर्यंत महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत व नातेवाईकांना मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.