सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
एकीकडे उसाची बिल मिळत होत नाहीत, तर दुसरीकडे शेतीला भाव मिळत नाही. तिसरीकडे बांधावरच्या इंचा-इंचा वरून भांडणं होतात आणि नव्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मात्र सरकारी कर्मचारी लोकांचा पाठिंबा मागतात, अन् दुसरीकडे लाचखोरी देखील सोडत नाहीत. इंदापूर तालुक्यातील भिगवणचा नालायक पोलीस कर्मचारी आज 25 हजारांची लाच मागताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीत सापडला.
भिगवण पोलीस ठाण्याचा हवालदार रामदास लक्ष्मण जाधव याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. शेतीच्या वादावरून भिगवण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. हा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी रामदास जाधव हा 25 हजारांची लाच मागत होता.
ही लाच आवाक्याच्या पलीकडची असल्याने संबंधित शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासंदर्भात पडताळणी केल्यानंतर रामदास जाधव याने लाच मागितल्याचे उघडकीस आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्या प्रकरणी रामदास जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधिक्षक माधुरी भोसले करत आहेत.