बारामती – महान्यूज लाईव्ह
प्रसिध्द अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्याविरोधात सन २०१९ मध्ये बारामती शहरातील विश्वास उध्दव लालबिगे यांनी किरकोळ फौजदारी अर्ज बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता. त्याचा तपासणी अहवाल कलम २०२ अन्वये दाखल केला, मात्र हा अहवाल सदोष असल्याने न्यायालयाने फेरतपासाचा आदेश करावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली, ती न्यायालयाने मान्य केली असून बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने बारामती पोलिसांना या प्रकरणाचा फेरतपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या नव्या आदेशामुळे सोनाक्षी सिन्हा चौकशीसाठी बारामतीत पोलिसांपुढे हजर होणार काय? अशी चर्चा सुरू झाली असून हे प्रकरण सन २०१९ मधील आहे. वाल्मिकी समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य व जातीवाचक शब्द वापरल्याप्रकरणी बारामतीत सोनाक्षी सिन्हा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.
त्याची दखल न घेतल्याने लालबिगे यांनी वकील अॅड. हेमचंद्र मोरे यांच्या वतीने न्यायालयात धाव घेतली. येथे न्यायालयात दाखल केलेल्या किरकोळ फौजदारी अर्जाची दखल न्यायालयाने घेत यामध्ये पोलिसांना कलम २०२ अन्वये तपासाचे आदेश दिले होते.
या तपासाचा अहवाल पोलिसांनी कोर्टात नुकताच दाखल केला, मात्र यामध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालावर अॅड. मोरे यांनी आक्षेप घेत पुन्हा कोर्टात फेरतपासाचा अर्ज केला. यामध्ये पोलिसांनी अहवाल सादर करताना सोनाक्षी सिन्हा यांनी संबंधित शब्दाचा वापर केल्याचे मान्य केले आहे, मात्र सोनाक्षीने कोणताही गुन्हा केल्याचे दिसून येत नाही असे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचा दावा अॅड. मोरे यांनी केला.
दरम्यान पोलिसांनी सोनाक्षी सिन्हा हिचा जबाब घेतलेला नाही, त्यामुळे आरोपीचा हा शब्द वापरण्याचा नेमका हेतू काय हे पोलिस अहवालातून स्पष्ट होत नसल्याने आरोपीचा जबाब येथे घेणे जरूरीचे आहे अशी मागणी अॅड. मोरे यांनी केली.
त्यावरून बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिश ज्योती दरेकर यांनी ३ एप्रिल २०२३ रोजी लालबिगे यांचा अर्ज मंजूर करून बारामती शहर पोलिसांना आदेश दिला आहे. ३१ मे २०२३ पूर्वी बारामती पोलिसांनी कलम २०२ अन्वये या प्रकरणाचा फेरतपास करावा असा आदेश दिला आहे.











