राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
भिमा पाटस च्या कथित भ्रष्टाचारावरून खासदार संजय राऊत यांनी आमदार राहूल कुल यांच्या नथीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेम धरला असून त्यांनी पुन्हा १ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कुल, सोमय्या व दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न विचारत भेटीची वेळ मागितली आहे.
१ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी गृहमत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे, बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला धरून राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना आरसा दाखवला.
राऊत यांनी लिहीलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे नमूद करून मात्र आपण जे बोलता आहात, त्याप्रमाणे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे का? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत कारवाई करण्यासाठी मी आपल्याकडे भेटीची वेळ मागतोय, मात्र गेली चार महिन्यांपासून आपण वेळ देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान राऊत यांनी ज्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे, त्यामध्ये भाजपचे आमदार राहूल कुल यांना लक्ष्य करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या पैशाची अक्षरशः लूटमार झाली असल्याचा आरोप करीत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचे मनीलॉन्ड्रींग झाल्याचा आरोप केला आहे. संबंधित कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व मी आपली यासंदर्भात भेट घेऊ इच्छितो असे राऊत यांनी नमूद केले आहे.
दुसरीकडे दादा भुसे यांनी गिरणा अॅग्रो या नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले, मात्र गिरणा कारखाना वाचविण्यासाठी गोळा केलेल्या पैशाचा अपहार झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखविण्यात आले आहेत, अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे असा टोला राऊत यांनी मारला आहे.
तिसरा मुद्दा किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित आहे. सोमय्या यांनी विक्रांत युध्दनौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा केला, मात्र हिशोब दिला नाही. उलट याची चौकशी सुरू होती, मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना क्लिनचिट दिली, हे धक्कादायक आहे, अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशावर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी अशी विनंती राऊत यांनी केली आहे.