भिगवण – महान्यूज लाईव्ह
१६ मार्च २०२३ रोजीची दुपारी साडेबाराची ही घटना.. भिगवणमधील प्रभु मेडीकलच्या शेजारील हिताची कंपनीच्या एटीएम केंद्रात दौंड तालुक्यातील वाटलूज येथील हेमंत गोफणे हे पैसे काढण्यासाठी गेले.. तिथे एका अनोळखी व्यक्तीने मी पैसे काढून देतो असे सांगितले आणि हातचलाखी करून त्यांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घेतला.. स्वतःकडील बनावट एटीएम कार्ड गोफणे यांच्याकडे दिले…अन चक्क १ लाख ३० हजार रुपये काढले..!
यावरून भिगवण पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. इंदापूर तालुक्यात यापूर्वीही निमगाव केतकी येथे असाच गुन्हा काहीच दिवसांपूर्वी घडला असल्याने भिगवण पोलिस सतर्क झाले. सहायक निरीक्षक दिलीप पवार यांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटिव्ही फुटेजची मदत घेत पथकांना तैनात केले. टोलनाक्यावर एका वाहनाचा संशय पोलिसांना आल्याने त्या दृष्टीने तपास सुरू झाला.
तांत्रिक तपासाची मदत यामध्ये मोलाची ठरली आणि पोलिस मुंबई, ठाणे परिसरात पोचले. तेथे पोचल्यानंतर आरोपीपर्यंत पोलिस पोचले, परंतू पोलिसांचा सुगावा लागताच पळू लागलेल्या आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पध्दतीने ताब्यात घेतले.
अहमद इस्तियाक अली (वय २७ वर्षे रा. मेढावा, कौथाला, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश), जैनुल जफरल हसन (वय २८, कमलानगर, चिंतामणी हॉटेलजवळ, बाईगणवाडी, गोवंडी, मुंबई, मूळ रा. मेढावा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश), इरफान रमजान अली (वय १९, रा. बजापूर, माझीगाव, प्रतापगड, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले.
या सर्वांकडून त्यांनी १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मारुती वॅगन आर कार व विविध बॅंकांचे ५१ एटीएम कार्ड असा ५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप पवार, फौजदार रुपेश कदम, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, रणजित मुळीक, चांगण व पोलिस मुत्र सुहास पालकर यांच्या पथकाने केली.