दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा गळित हंगाम संपला. या हंगामात कारखान्याने ४ लाख ६० हजार मेट्रिक टनाचे गाळप केलेले असून पहिला हप्ता प्रतिटनी २ हजार ६०० रूपये जाहीर केलेला असून १५ डिसेंबरअखेर बीलेही जमा करण्यात आलेली आहेत.
दरम्यान ३१ मार्चपूर्वी सर्वच शेतकऱ्यांना आपल्या सोसायटीचे कर्ज भरण्याची चिंता असते. तसेच ऊस उत्पादकांनाही हीच चिंता भेडसावत असते. किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी कारखान्याकडे १५ फेब्रुवारीअखेर गळिताकरिता ऊस पाठविलेल्या ऊस उत्पादक सभासदांची चिंता मिटवली.
त्यांच्या सोसायटीच्या कर्जाची होणारी रक्कम २६ कोटी ८८ लाख ७ हजार ७५ रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सभासदांच्या सोसायटी कर्ज खाती जमा केली. दरम्यान उर्वरित १६ फेब्रुवारी ते १४ मार्चअखेर शिल्लक राहिलेल्या सोसायटीची बीलेही लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गर्तेत सापडलेला कारखाना सुरू करणे हे मोठे आव्हान आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे होते. परंतु सभासदांच्या पाठींब्यामुळे व सभासदांना दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा कारखाना सुरू केला. सभासदांनीही आपला हक्काचा कारखाना सुरू होणार असल्याने संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे गळिताकरिता पाठविला.
मागील व्यवस्थापनाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची सोसायटीची रक्कम ३१ मार्चपूर्वी कधीच जमा करण्यात आलेली नव्हती. त्यांच्या कारकिर्दीत सभासदांसमोर कारखान्याचे वेगळेच चित्र निर्माण करून सभासदांना कायमच गोड बोलून फसविण्याचा उद्योग केला. त्यांनी केलेल्या कामामुळेच कोणतीही बँक आपल्या कारखान्यास अर्थसहाय्य करीत नव्हती. त्यामुळे उत्पादित झालेली साखर विकुनच आमच्या व्यवस्थापनास सर्व देणी द्यावी लागत होती.
साखरेचे दर हे कधीही स्थिर नसतात, त्यामुळे सभासदांची देणी देण्यास विलंब झालेला आहे. परंतु सभासदांच्या आवश्यकतेनुसार त्यांना काही प्रमाणात अॅडव्हान्सही देण्यात आलेला होता. ३१ मार्चपूर्वी सभासदांच्या सोसायटीचे कर्ज निरंक करण्याचा आमदारांचा प्रामाणिक हेतू होता. त्याप्रमाणे १५ फ्रेब्रुवारीअखेर गळितास आलेल्या सभासदांच्या सोसायटी कर्ज खात्यामध्ये २६ कोटी ८८ लाख ७ हजार ७५ रूपये वर्ग केलेले आहेत.
ही रक्कम सोसायटीकडे वर्ग केल्यामुळे सभासदांना शासनाची मदत मिळछन व्याजातही सुट मिळणार असुन पुढील कर्ज मिळणेही सुलभ होणार आहे. १५ डिसेंबरपर्यंतचा पहिला हप्ता दिलेला असून उर्वरित पेमेंटही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा चेअरमन मकरंद पाटील यांचा मानस असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.