बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात मोलमजुरी करून घरचा प्रपंच चालवणाऱ्या नवनाथ सोमनाथ माने याला आपलं स्वतःचं घर स्वतःच्या जागेत असावं असं वाटत होतं.. मग त्याला भेटला मानवाधिकार संघटनेचा अमीन हंबीर शेख.. स्वस्तात प्लॉट देतो म्हणत या आम्ही त्याला अडीच लाख रुपयांना लुटलं..धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळही केली..
याप्रकरणी बारामती पोलिसांनी अमीन शेख याच्यावरती फसवणूक व जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ माने याला मी तुला स्वस्तात प्लॉट घेऊन देतो असे अमीन शेख यांनं सांगितलं आणि त्यानुसार माने यांनी शेख याला दोन लाख 65 हजार रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात दिले.
त्यानंतर माने यांनी शेख यास मला देणार असलेला प्लॉट माझ्या नावावर लवकर करा अशी विनंती केली. मात्र सातत्याने टाळाटाळ सुरू झाल्याने व शेख हा मानवाधिकार संघटनेची भीती घालत असल्याने माने यांनी पोलिसांची मदत घेतली.
पोलिसांनी दोघांना बोलावून घेऊन शेख याला लगेचच पैसे दे अशी सूचना केली, मात्र तरीही शेख हा टाळाटाळ करत असल्याने व जातीवाचक शिवीगाळ करत असल्याने माने यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.