विक्रम वरे :महान्यूज लाईव्ह
काल शनिवार आणि आजचा रविवार बारामती तालुक्यातील होळ आणि मुरूमच्या भागातील नीरा नदीकाठच्या भागात अस्वस्थतेचा होता.. एखाद्या देशामध्ये अनागोंदी पसरली आणीबाणी घोषित झाली किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की तांडेच्या तांडे आणि हजारोंच्या संख्येने लोक वाट मिळेल तशा दिशेने दुसऱ्या देशात आश्रयाला जातात गदी तसंच काही चित्र निरा नदीमधील होळ आणि मुरूमच्या बंधार्यावरील हद्दीमध्ये पाहायला मिळालं.
नीरा नदीतील सांगवी पासून ते इंदापूर पर्यंतच्या प्रदूषणाची चर्चा सातत्याने केली जात आहे. नीरा नदीतील पाण्याचा कुबट वास येत असून या नदीतील मासे मरत आहेत असा आरोप येथील शेतकरी करताना दिसत आहेत हे प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर पातळी जात असूनही यावर गांभीर्याने व जलदपणे पावले उचलले जात नाहीत काल त्याचा एक परिणाम दिसून आला.
नीरा नदीमध्ये मुरूम बंधाऱ्यात स्वच्छ पाणी तर होळ कोऱ्हाळे खुर्द भागातील बंदाऱ्यात दूषित पाणी असे चित्र आहे. होळ भागातील बंधाऱ्यात असलेल्या दूषित पाण्यातील मासे, त्यांचा श्वास गुदमरू लागल्याने स्वच्छ पाण्याकडे धावू लागले. गेल्या दोन दिवसात त्यांचा हा प्रवास दिसू लागला, मात्र एखाद्या बस स्थानकात बसमध्ये शिरण्यासाठी जशी लोकांची झुंबड उडते तशा प्रकारे मुरुम बंधाऱ्याच्या बाजूने स्वच्छ पाण्याच्या दिशेने जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मासे एकवटले होते.
साहजिकच जीव वाचवण्यासाठी आलेले मासे पाहून पक्षी आणि कुत्री त्या ठिकाणी जमा झाले आणि लोकांचेही लक्ष त्याकडे गेले. अशा परिस्थितीमध्ये जिवंत असलेले मासे घेण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली. अगदी जीप, टेम्पो भरून लोकांनी मासे नेले.
मात्र स्वच्छ पाण्याच्या दिशेने मुरुम बंधाऱ्याच्या बाजूने लाखो मासे झुंडीने निघाले होते. पण उंचावरून पाणी पडत असल्याने त्यांचा प्रवास थांबला. ढगाई मंदिराच्या बाजूला हा सगळा प्रकार आज सकाळपासून लोकांनी आपल्या डोळ्यांनी टिपला. जर त्या माशांना बोलता येत असते, तर त्या माशांनी ओरडून आम्हाला वाचवा अशी हाक मारली असती, परंतु मानवनिर्मित संकटातून आपला जीव जातो आहे म्हणून त्यांनी माणसांना हाका मारणे बंद केले असावे आणि आपला जीव जाताना पाहणे पसंत केले.
नीरा नदीवरील प्रदूषणाचा प्रश्न सध्या गंभीर होताना दिसत आहे. साखर कारखान्यांच्या परिसरातून तसेच फलटण तालुक्यातील एका मोठ्या कत्तलखान्यासह एका दूध प्रकल्पातून प्रदूषित पाणी जाते अशी चर्चा आणि अशा आरोपांनी आता या परिसरातील वातावरण तापू लागले आहे. अगदी याची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार असतील यांनी देखील गांभीर्याने घेतली आहे. तसे त्यांच्या वक्तव्यावरून तरी दिसतच आहे.
प्रदूषित मासे विकणाऱ्यांना सूचना..
दरम्यान बंधाऱ्यावरील प्रदूषित पाण्यापासून स्वच्छ पाण्याकडे जाणारे जिवंत मासे पकडणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या मासे विक्रेत्यांची पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. न जाणो हे मासे खाऊन, जर कोणाला त्रास झाला तर? या भीतीने देखील परिसरात चर्चा सुरू झाली होती. त्याचीच गंभीर दखल घेत पोलिसांनी याप्रकरणी मासे विक्रेतांना हे मासे विकले जाऊ नयेत यासाठी सूचना दिल्या.