छबिना, शोभेची दारुकाम व करमणुकीचे कार्यक्रम .. उद्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीच्या श्री केतकेश्वर महाराज यात्रेस काल शनिवार (दिनांक १ एप्रिल ) पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस यात्रा भरत असून आज सायंकाळी छबिना,शोभेची दारुकाम व करमणुकीचे कार्यक्रम होणार आहे.तर उद्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या लाल मातीतील चिंचेच्या आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे..
काल सायंकाळी सांयकाळी ५ वाजल्यापासून रथाची मिरवणूक काढण्यात आली. तीन मजली लाकडी रथ त्यामध्ये ठेवलेली आकर्षक शंकराची पितळी मुर्ती असते. रथाची भाविकांनी मोठ्या दोरखंडाच्या साहाय्याने हाताने ओढत ग्रामप्रदक्षिणा घातली.रथाच्या मिरवणुकीचे दृष्य मनमोहक होते.रथाचे भाविकांनी मनोभावे नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
रथाच्या पुढे मानाच्या कावडींनी या मिरवणूकीत रंगत आणली. आज रविवारी (दिनांक २ एप्रिल) रोजी सांयकाळी ६ वाजता छबीन्यात पालखीची मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या नंतर शोभेचे दारूकाम होईल. रात्री ९ वाजता खास महिलांसाठी वैभव म्युझिकल नाईटस कोल्हापूर मराठी लोकगीते हा मनोरंजनाचा कार्यक्रम तर खास पुरुषांसाठी स्वतंत्ररित्या मंगला बनसोडे यांचा तमाशा आयोजित करण्यात आला आहे .
उद्या (दि.३ एप्रिल) लाल मातीतील मर्दानी खेळ अशी ओळख असणाऱ्या कुस्त्यांच्या जंगी मैदानावर दुपारी एक वाजल्यापासून गावातील ऐतिहासिक चिंचेच्या आखाड्यात सुरुवात होणार आहे. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले अनेक नामांकित पैलवान या आखाड्याला लढतीसाठी हजेरी लावणार आहेत.
या आखाड्यात २०२२ चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उप महाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख विरूध्द उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, निमगाव केतकीचा प्रसिद्ध मल्ल दादुमिया मुलाणी विरुद्ध शुभम शिदनाळे, पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध संतोष जगताप, महारुद्र काळे विरुद्ध सुदर्शन कोतकर, राघू ठोंबरे विरुद्ध मनीष रायते ,समीर शेख विरुद्ध भैरू माने, सतपाल सोनटक्के विरुद्ध अरुण बोंगाडे, मामा तरंगे विरुद्ध शुभम कोळेकर, अनिल कचरे विरुद्ध ऋषी हरीगुडे, सागर भोंग विरुद्ध हनुमंत शिंदे, अभिजीत शेंडे विरुद्ध अजय राजमाने, अक्षय खामगाळ विरुद्ध मोईन पटेल या प्रमुख निकाली कुस्त्या होणार आहेत. तर अशा तीनशे हून अधिक कुस्त्या या आखाड्यात रंगणार आहेत. यात्रेनिमित्त गावात मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली असून भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.