बारामती – महान्यूज लाईव्ह
जमीन खरेदी केल्यानंतर जमीनीचे मालक येथे राहत नाहीत, याचा गैरफायदा घेऊन जमीन मालकाच्या मुलाच्या मित्रांनी बनावट महिला उभी करून तिलाच जमीनमालक ठरवून जमीनीचे खरेदीदस्त केल्याचा प्रकार बारामतीत उघडकीस आला असून यावरून बारामती शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात प्लॉट खरेदी करून देतो या नावाखाली दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा एक गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, त्यावरून दोघांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील वैद्यकीय व्यवसायिक महिलेची जमीन तिच्या परस्पर वेगळ्याच व्यक्तींना विकली गेल्याचा हा गुन्हा असून यासंदर्भात पुण्यातील विद्या शांताराम शिंदे यांनी फिर्याद दिली होती. शिंदे यांचे पती निवर्तले असून त्यांचा मुलगा कॅनडात असतो. २० मार्च रोजी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर मंगेश विलास काळे (रामवाडी, गोपाळवाडी, ता. दौंड), एक अनोळखी महिला, राहूल सुरेश माने (रा. दौंड), किरण पाटील (रा. थेरगाव, पुणे) व शिवराज हनुमंत थोरात (सूर्यनगरी, बारामती) या पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शिंदे यांनी सन १९९४ मध्ये शहरात एक प्लॉट खरेदी केला होता. वैद्यकीय व्यवसायासाठी पुण्यात असल्याने याकडे त्यांना लक्ष देणे जमत नव्हते. मात्र १२ मार्च २०२३ रोजी हा प्लॉट मंगेश विलास काळे याच्या नावावर असल्याची नोटीस वृत्तपत्रातून समजल्याने त्यांनी बारामती येथे येऊन शहानिशा केली. तेव्हा बोगस महिला उभी करून बनावट कुलमुखत्यार दस्त मंगेश काळे याच्या नावे ४ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आल्याचे त्यांना दिसून आले व या कुलमुखत्यार दस्ताच्या माध्यमातून १३ लाख रुपयांना हा प्लॉट खरेदी केल्याचे दाखविण्यात आले. साक्षीदार म्हणून मुलाची खोटी स्वाक्षरी केली. मात्र मुलगा हा कॅनडा येथे असतो. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शिंदे यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या गुन्ह्यातही महिलेचीच आर्थिक फसवणूक करण्यात आली असून अनिता सुधाकर त्यारे यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. यामध्ये बिपीन दळवी, कृष्णा वैराट (दोघेही रा. बारामती) यांच्याविरोधात त्यांनी फिर्याद दिली असून १८ मार्च २००८ पासून ते आजपर्यंत झालेल्या व्यवहारावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अनिता त्यारे यांच्या पतींचा सराफी व्यवसाय असून बिपीन दळवी हा सुधाकर त्यारे यांचा मित्र होता. त्याने कटफळ येथे कमी किंमतीत ४ गुंठ्याचा प्लॉट असल्याचे सांगून जमीनीचा मूळ मालक कृष्णा वैराट असल्याचे सांगितले.
१३ मार्च २००८ रोजी दळवी व वैराट यांना दीड लाखांची रक्कम रोख स्वरुपात दिल्यानंतर त्यांनी पावतीवर स्वाक्षऱ्या केल्या. मात्र जमीनीचा गट नंबर किंवा इतर कोणतीच माहिती दिली नाही. मात्र फक्त चार गुंठे जमीनीचे खरेदीखत होत नसल्याने या प्लॉटमध्ये इतरही लोक असल्याने सर्वांच्या बरोबर हे खरेदीखत करू असे सांगितले.
मात्र आजतागायत हा प्लॉट खरेदी करून दिलेला नाही. पैसे देण्यास दोघेही टाळाटाळ करीत असल्याने अनिता त्यारे या्ंनी बारामती शहर पोलिसांकडे धाव घेतली व फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी २८ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल केला असून फौजदार घोडके पुढील तपास करीत आहेत.