दौंड तालुक्यातील खामगाव येथील घटना!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खामगाव येथे शेतकऱ्यांच्या गोठ्यावर काम करणाऱ्या दोन परप्रांतीय मजुरांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्लाखोराने एकाचा गळा चिरून खून केला तर दुसऱ्याला शरीरावर ठिकठिकाणी धारधार हत्याराने वार केल्याने तो गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर संबंधित आरोपी हा फरार झाला अशी माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामगाव येथील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक कुणाल सदाशिव कवडे यांच्या दुग्ध व्यवसायाच्या गोठ्यावर परप्रांतीय कामगार काम करतात.
या काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर मुकेश उर्फ मुक्तार यादव ( वय ४५ रा.धरमपुर जि. गाझीपुर उत्तरप्रदेश) याचा कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून गळा चिरून खून केला, तसेच रामकुंवर यादव (वय ४४ रा. डिग्गी जि.चंदोली उत्तरप्रदेश) याच्यावर आरोपीने कोणत्यातरी कारणावरून कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. या प्रकरणी शेतकरी कुणाल कवडे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संशयित आरोपी पिंटू अशोक गायकवाड (पूर्ण पत्ता माहीत नाही) याच्यावर खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर संशयित आरोपी पिंटू गायकवाड हा फरार झाला असून यवत पोलीस त्याचा शोध घेत आहेत.