सचिन पवार- महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपे येथील घटनेने अजूनही अनेकजण धक्क्यात आहेत. येथे अशा प्रकारचा धाडसी, सशस्त्र दरोडा वर्दळीच्या भागात कसा काय पडू शकतो याचीच चर्चा अधिक आहे, मात्र त्यापेक्षाही चर्चा आहे ती, जिगरबाज पोलिस दत्ता धुमाळांची..! सराफी दुकानाला खेटून असलेल्या सलूनमध्ये दाढी करण्यासाठी धुमाळ आले आणि त्यांनी सारी बाजी पलटवली..!
सुप्याच्या घटनेत पोलिस कर्मचारी दत्ता धुमाळ यांनी केलेली कामगिरी काल रात्रीपासूनच आमदार, खासदारांनीही डोक्यावर घेतली. सगळीकडे दत्ता धुमाळांचेच कौतुक सुरू आहे. अनेकांच्या स्टेटसवर धुमाळांचे फोटो आहेत, नेमकं सुप्यात असं काय घडंलय की, ज्यामुळं धुमाळांचा डंका वाजतोय? तर त्याची कहाणी सुरू होते, शेजारच्या सलूनच्या दुकानातून..!
स्थळ – सुपे, ता. बारामती.. वेळ ६ वाजून ४० मिनीटे… महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे अगोदर शटर खाली घेतले जाते.. अन तेवढ्यात वेगाने वर घेतले जाते.. पाठोपाठ गोळीबाराचे दोन आवाज ऐकू येतात.. काही कळायच्या आत रस्त्यावरचे लोकही दुकानाकडे धावत येत असतात.. त्यांना काही कळायच्या आत शेजारच्या सलून दुकानातून वीजेच्या चपळाईने दत्ता धुमाळ त्या चोरट्यांच्या दिशेने धावतात.. एकावर कब्जा घेतात.. लगेचच दुकानाच्याच समोर गप्पा मारत उभे असलेले अॅड. चंद्रशेखर जगताप, बाबुर्डीचे पोलिस पाटील राजू लव्हे हेही धुमाळांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या हातात पिस्तूल पाहताच वेगाने धावतात व धुमाळांच्या ताब्यातील त्या व्यक्तीला घेराव घालतात..
फक्त डोळ्याचं पाते लवायचा काळ.. त्या संधीकाळात लोकांच्या लक्षात येतं की, येथे दरोडा घालण्याचा प्रयत्न झालाय.. गोळीबारही झालाय.. जिवाच्या आकांताने बाहेर येणाऱ्या अश्विनी जाधव देखील जोरात ओरडताहेत.. मग मात्र लोकांच्या संतापाला वाट फुटते.. ताब्यात घेतलेल्या दरोडेखोराचा मग सगळ्या बाजूंनी राग काढण्याचा प्रकार सुरू होतो. त्यातूनही दत्ता धुमाळ, राजू लव्हे, अॅड. जगताप या दरोडेखोराला बाजूला घेऊन पोलिस ठाण्यात नेतात.. कायद्याने त्याचे काम चोख केलेले असते.. एक म्हणजे त्याला ताब्यात घेणे आणि दुसरे म्हणजे जमावापासून वाचवण्याचे..!
प्रसंग संपलेला असतो.. सगळीकडे बातम्या पसरलेल्या असतात..आपण काय केलंय हे लगेच लक्षात न आलेले दत्ता धुमाळ आपल्या सहकाऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या कौतुकाने ओशाळतात..आणि मग घडलं कसं याचा फ्लॅशबॅक सुरू होतो.
दत्ता धुमाळ हे सलूनमध्ये दाढी करण्यासाठी आले होते. दाढी झाल्यानंतर आता दुकानातून बाहेर पडणार, तोच शेजारच्या म्हणजे अगदी दोन ते तीन फूटाच्या पलीकडे सुरू असलेल्या या घटनेचा थरार सहज क्लिक होतो.. आणि काहीही विचार न करता त्यांच्यातील जागा झालेला पोलिस सदरक्षणाय.. खलनिग्रहाणाय चा नारा डोक्यात घेऊन तेच बधीर झालेले डोके जीवाची पर्वा न करता आपले काम चोखपणे पार पडते..
यात मग रात्रीच्या वेळी पुन्हा जेव्हा गिणती सुरू होते, तेव्हा महालक्ष्मी ज्वेलर्स मधून १३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरीला गेला अशी फिर्याद अश्विनी जाधव देतात.. आणि दुसरीकडे पकडलेल्या दरोडेखोराची गिणती करताना लक्षात येते की, त्याच्या पिस्तूलमध्ये अजून १३ गोळ्या शिल्लक होत्या… या काडतूसाकडे पाहिल्यानंतरच लक्षात येते की, दत्ता जाधवांनी खरंच किती डोंगराएवढं काम या गावासाठी.. कायद्याच्या रक्षणासाठी केलंय.. मग मात्र भानावर आलेल्या सगळ्यांच्या मोबाईल स्टेटसवर दत्ता धुमाळांचे फोटो झळकलेले असतात.. ते अगदी पार आमदार, खासदारांपर्यंत..!