शिरूर : महान्यूज लाईव्ह
कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर घराकडे घेऊन येत असताना झालेल्या अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
भूषण विजय रणदिवे(वय.३२) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सर्वत्र कांद्याची काढणी जोरात सुरू आहे.कांद्याला बाजारभाव मिळत नसून ही अनेकजण कांदा भरून वखारी मध्ये साठवून ठेवतात तर काही मिळेल त्या बाजारभावात कांदा विक्री करत आहेत.
रांजणगाव सांडस येथे भूषण रणदिवे याच्या कुटुंबीयांनी दिवसभर कांदा काढल्यानंतर सायंकाळच्या सुमारास कांदा भरण्याची लगबग सुरू होती.काढलेला कांदा ट्रॅक्टर मध्ये भरल्यानंतर वडील विजय यांच्यासह कुटुंबातील सदस्य हे घराकडे येत होते. यावेळी तीव्र उतारावर ट्रॅक्टर येत असताना नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यावेळी भूषण हा ट्रॅक्टर खाली अडकल्याने जागीच गतप्राण झाला. तर इतरही थोडक्यात बचावले.
दरम्यान जेसीबीच्या साहाय्याने भूषण यास बाहेर काढण्यात आले. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भूषण रणदिवे हा युवक अत्यंत शांत स्वभावाने सर्वत्र परिचित होता. शेतीत नाविण्याने विविध प्रयोग राबवत होता. त्याच्या झालेल्या दुर्दैवी निधनाने रांजणगाव व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.