नाशिक : महान्यूज लाईव्ह
एका सावकाराने सावकारी केली. सावकार त्रास देतो म्हणून सावकाराविरोधात ज्यांचा छळ झाला त्यांनी तक्रार केली. पण सावकाराच्या नातूने थेट सहायक निबंधकालाच गाठले, पण या सहायक निबंधकाची भूक एवढी मोठी की, थोडी थोडकी नव्हे तब्बल २० लाख रुपयांची लाच मागितली..!
आता नाशिक जिल्ह्यातला निफाड आणि सिन्नर येथील सहाय्यक निबंधक रणजीत महादेव पाटील आणि निफाडच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीर हे दोघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तर अडकले आहेत, पण असे न अडकलेले राज्यातील किती सहाय्यक निबंधक असतील? की जे अशा केसेस मध्ये पैसे घेऊन कारवाई होऊ नये यासाठी निकाल देत असतील, याचा विचार न केलेला बरा!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सावकारी कायद्यानुसार तक्रारदाराच्या आजोबावर कारवाई न करण्यासाठी रणजीत पाटील याने 29 मार्च रोजी वीस लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ठरलेली रक्कम मुंबई नाका येथे स्वीकारताना रणजीत पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपवत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अप्पर अधीक्षक एन. एस. न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप साळुंखे, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, नितीन कराड यांच्या पथकाने केली