पंढरपूर : महान्यूज लाईव्ह
दररोज काही मिलिमीटर अथवा सेंटीमीटरने घरंगळत चाललेला, खचत चाललेला जोशीमठ देशातील सर्वांच्या चिंतेचा विषय असतानाच भूस्खलनाचे प्रकार राज्यातही विविध ठिकाणी घडत आहेत. आज पंढरपूरमध्ये चक्क घरामध्ये तीस फूट खोलीचा खड्डा पडला आणि या खड्ड्यात तीन महिला देखील पडल्या. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले आहे.
पंढरपूर शहरातील कोळी गल्ली परिसरातील राहुल शिंदे यांच्या घरी ही घटना घडली. आज दुपारच्या वेळी अचानक घरातील फरशा खचल्या आणि तब्बल तीस फूट खोलीचा खड्डा पडला. या खड्ड्यात घरात बसलेली शिंदे यांच्या नातेवाईक महिला पडली. त्यानंतर शिंदे यांची 90 वर्ष वयाची आई देखील या खड्ड्यात पडली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजारची महिला हे पाहण्यासाठी तेथे आली. तिलाही अंदाज सापडला नाही, ती देखील पडली.
घरातल्या खड्ड्यात तीन महिला अचानक पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मग स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी घरातीलच साड्यांचा वापर दोरखंडासारखा केला. काही जण खाली खड्ड्यात उतरले. या खड्ड्यात पाणी होते. मात्र त्यातूनही या स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून या तीन महिलांना साडीचा दोरखंड करून त्यांना बाहेर काढले.