संदीप मापारी पाटील, बुलढाणा
महाराष्ट्रात गटागटाने यायचे, बॅकांमध्ये एकेकावर नजर ठेवायची..वाहनाच्या डिक्कीपासून ते घरातील मजबूत कुलूपापर्यंत सारे त्यांच्या कौशल्यापुढे फिके पडायचे.. आणि लाखोंचा ऐवज चोरून ही गुजराती छर्रा गॅंग पसार व्हायची.. बुलढाण्याच्या पोलिसांनी मात्र प्रयत्नांची शिकस्त केली आणि ही छर्रा गॅंग जिथे परिंदा भी पैर नही मार सकता अशा संवेदनशील भागातून पकडून आणली..
बुलढाण्याच्या खामगाव शहरात १६ मार्च रोजी गांधी चौकातून अॅक्टीवा मोटार सायकलच्या डिक्कीतून सहा लाख रुपये चोरीला गेले. अशा प्रकारची चोरी ही वेगळी होती. पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना याबाबत सूचना केल्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी सहकाऱ्यांसमवेत याचा अभ्यास केला. बुलढाण्यासह अकोला, खामगांव, व यवतमाळ या ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या.
त्यामुळे आरोपी हे आजुबाजुच्या परीसरात असण्याची शक्यता असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके तयार करुन त्यांना सुचना दिल्या. १७ मार्च रोजी खामगाव शहरातील बाळापूर रस्त्यावरील आनंदसागर येथे तवेरा गाडी व युनिकॉर्न दुचाकीसह ९ ते १० जण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अजयकुमार अशोकभाई तमंचे वय 42 वर्षे, (2) जिगनेश दिनेश घासी वय 44 वर्षे, (3) रितीक प्रविण बाटुंगे वय 23 वर्षे रा. कुबेरनगर, अहमदाबाद (गुजरात) या तिघांना तेथेच पोलिसांनी ताब्यात घेतले. बाकीचे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.
पकडलेल्या तिघांकडून दुचाकीची डुब्लीकेट नंबर प्लेट बनविण्यासाठी लागणारे रेडीयम स्टिकर, वाहनाचे लॉक तोडण्यासाठी टोक असलेल्या चाव्या, दोन धारदार चाकू, कात्र्या, मिरची पावडर, रोख रक्कम आदी ६ लाख ७६ हजारांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला.
या सर्वांनी शेजारच्या जिल्ह्यातही चोऱ्या केल्या असल्याचे यातून उघडकीस आले आणि पोलिस अधिक सतर्क झाले. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी याबाबत ही फरार असलेली टोळी पकडण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करुन अहमदाबादकडे रवाना केले.
विशेष म्हणजे संशयिता्ंचे फोटो, मोबाईल नंबर किंवा अन्य काहीही माहिती नसतानाही ही पथके अहमदाबाद येथील छर्रा नगर, कुबेर नगर या परीसरामध्ये पोचली. तेथे गेल्यानंतर लक्षात आले की, हा परिसरच संवेदनशील आहे. तेथून गुन्हेगारांना घेऊन जाणे शक्यच नाही अशा परिस्थितीत या संशयितांना त्यांच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी पथकातील सदस्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या केल्या.
याला यश आले आणि संशयित त्या परिसरातून बाहेर पडून पावागड परिसरात पोचले. मात्र तेथे नवरात्रौत्सव असल्याने यात्रा व गर्दी होती. तेथे या सर्वांना पकडणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी हे सर्व संशयित वडोदरा ते गोध्रा दरम्यानच्या डाकोर या आणखी एका संवेदनशील परीसरामध्ये असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली.
तेथे मात्र पथकाने या सर्वांना ताब्यात घेतले. या सहा जणांना महाराष्ट्रात आणून अटक करण्यात आली. यामध्ये सन्नी सुरेंद्र तमांचे वय 35 वर्षे, दिपक धिरुभाई बजरंगे वय 40 वर्षे, मयूर दिनेश बजरंगे वय 39 वर्षे, राजेश ऊर्फ राकेश देवची तमांचे वय 49 वर्षे, रवि नारंग गारंगे वय 55 वर्षे, मुन्नाभाई मेहरुनभाई इंदरेकर वय 60 वर्षे (सर्व रा. छर्रा नगर अहमदाबाद गुजरात) या सहा जणांचा समावेश आहे.
पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक निरीक्षक राहूल जंजाळ, विलासकुमार सानप, संदीप सावले पोलीस अंमलदार गणेश किनगे, शरद गिरी, राजकुमार राजपूत, गजानन दराडे, केदार फाळके, अजीज परसूवाले, मधुकर रगड, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, वैभव मगर, विजय सोनोने, सुरेश भिसे, युवराज राठोड, गजानन गोरले, जगदेव टेकाळे, सतिष जाधव, दिगांबर कपाटे, सचिन जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशनचे राजू आडवे, कैलास ठोंबरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
कशी करायची चोरी?
आरोपी हे गुजरात मधुन निघतांना एक किंवा दोन चारचाकी वाहन व तीन किंवा चार दुचाक्या घेऊन एक ठिकाण निवडायचे निवडलेल्या ठिकाणाजवळ एखादे प्रसिध्द देवस्थान शोधायचे. तेथे राहायचे असे प्रकार करतात. आतापर्यंत केलेल्या चोऱ्यांच्या दरम्यान हे संशयित महाराष्ट्रामध्ये शेगांव, माहुर व शिर्डी येथे थांबलेले होते.
ते दोन गट बनवायचे. एक गट बँकेमध्ये जाऊन जास्त पैसे कोण
काढतो यावर लक्ष ठेवायचा. मग त्याचा पाठलाग करायचा व तोपर्यत त्याची इतर साथीदारांना माहीती द्यायचा. बॅग जर गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली असल्यास 5 ते 10 सेकंदामध्ये डिक्कीचे लॉक तोडून रक्कम लंपास करायचे. हातात असल्यास हिसकावून गाडीवरून फरार व्हायचे अशी त्यांची पध्दत आहे. पकडलेल्या टोळीचे दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य हे कार्यक्षेत्र असल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले.