बारामती – महान्यूज लाईव्ह
गेली तीन वर्षे राज्यात वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द झालेल्या व विविध गुन्हे दाखल असलेल्या वकील गुणरत्न सदावर्तेंना महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने दोन वर्षांसाठी वकीलीची सनद रद्द करून धक्का दिला.. अर्थात यामागे पिंपरी चिंचवडचे वकील अॅड. सुशील मंचरकर व बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी गेली दोन वर्षे दिलेला अविरत लढा हे कारण आहे.
सदावर्ते यांनी ज्येष्ठ नेते शऱद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ला प्रकरणात केलेले वक्तव्य, विविध आंदोलनादरम्यान केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि वकीलाचा गणवेश, बॅण्ड घालून केलेली वक्तव्ये व आंदोलने यामुळे अॅड. सुशील मंचरकर व नितीन यादव बार कौन्सिलकडे धाव घेतली होती.
त्यावरून सुनावण्या सुरू असतानाच सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात यादव व मंचरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करून त्यांनी बार कौन्सिलकडे दाखल केलेल्या तक्रारी रद्द कराव्यात अशी मागणी केली होती.
मात्र आठ दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्तेंनी केलेली तक्रार फेटाळली आणि बार कौन्सिलला त्यांच्याकडील तक्रारींवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यावरून बार कौन्सिलच्या सदस्यांनी सदावर्ते यांच्याकडून चूक झाल्याचे ग्राह्य मानून त्यांची वकीलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली. या प्रकरणासाठी नितीन यादव आणि सुशील मंचरकर हे स्वखर्चाने गेली दोन वर्ष लढा देत होते.