रामभाऊ जगताप : महान्यूज लाईव्ह
भेदाभेद अमंगळ अशी शिकवण संतांनी देऊन प्रभुची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी.. असा उपदेश दिला आहे. परंतु जातीधर्माच्या विळख्यात अडकलेल्या माणसांना त्याचा अधून मधून विसर पडतो. त्यामुळेच राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होते. असे असले तरी बारामती तालुक्यातील मुढाळे येथील शाह फकरूद्दीन बाबा यांचा उरूस शेकडो वर्षांपासून राष्ट्रीय एकात्मता जपत आहे.
मुढाळे गावचा उरूस म्हणजे कोणत्या एका जाती धर्माचा उत्सव नसून सगळे गाव एक होण्याचे ठिकाण आहे. पिढ्यानपिढ्या होत असलेल्या शाह फकरूद्दीन बाबांच्या ऊरसाला नैवेद्याचा मान हिंदूंना असतो. येथील उरसाला सर्व जातीधर्मातील अबाल वृद्ध येतातच, तर एवढेच काय, माहेरवाशिणी देखील हमखास हजेरी लावतात.
बारामतीसह सुपे, माळेगाव आणि मुढाळे येथील उरूस हे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतात. त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी एकतेचे दर्शन होत असल्याची प्रतिक्रिया मुढाळे येथील सिराज मुजावर यांनी दिली.