घनश्याम केळकर
आपल्या महान संस्कृती बाबतीत जेवढे लिहावं तेवढ कमीच आहे. खुप लोकांनी खुप लिहून ठेवलय, पण एका विषयाकडे सर्वांनी साफ दुर्लक्ष केले आहे. म्हणून नाईलाजाने माझ्यासारख्या सामान्य माणसाला या विषयावर लिहावं लागतय.
मी साधा असलो तरी संशोधक वृत्तीचा माणूस आहे. एकदा मी असा विचार केला,ही आपली महान मराठी भाषा, या भाषेत सर्वांत जास्त वापरला जाणारा शब्द कोणता याचा शोध घ्यायचा. मग मी माझ्या मोबाईलमध्ये व्हाईस रेकार्डर चालू केला आणि सगळ्या गावात चक्कर मारली. एस टी स्टॅंडवर, काॅलेजमध्ये, बाजारपेठेत, सगळीकडे.
मग मी झालेले रेकार्डिंग पुन्हा पुन्हा ऐकलं. त्यावरुन मी जे निष्कर्ष काढले तेच तुमच्यापुढे मांडत आहे.
आई ……आपल्या भाषेत सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द. असा माझा निष्कर्ष आहे. पण आईसोबत वापरले जाणारे शब्दही ऐकण्यासारखे आहेत. कॉलेजमध्ये मी गेलो, एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणत होता, “कारे आईघाल्या, आज उशीरा का आला, “. दोघे एकमेकांचे जानी दोस्त वाटत होते. दुसऱ्याने उत्तर दिले, ” आई घातली, आज जागच आली नाही लवकर.” हे एक उदाहरण दिले. रस्त्यावर, मार्केटमध्ये सगळीकडे सार्वजनिक ठिकाणी सतत कानावर पडणाऱ्या या आईच्या आठवणीने आपले मन भरून येते. केवळ स्वत:च्या नाही तर दुसऱ्याच्या आईची आठवण काढणारी ही किती महान संस्कृती.
तर आता तुमच्या लक्षात आले असेलच, की या लेखाचा विषय आहे शिव्या.
आता शिव्या या विषयावर लिहायचं तर आपल्या प्राचीन संस्कृतीकडे जावे लागेल. आपले थोर ऋषी मुनी शिव्या द्यायचे का? आणि देत असतील तर कुठल्या देत असतील. कुठल्या भाषेत देत असतील. आपल्याकडे काही पुरावा नाही. का शिव्यांची पद्धत इतर अनेक गोष्टी प्रमाणे परकिय आक्रमकांनी आपल्याकडे आणली.
जाऊ द्या, आपण या वादात शिरायला नको.
पण शिव्या हा दुर्लक्षित असला तरी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. त्याचा अभिमान बाळगायचा कि नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा.
अगोदर मी तुम्हाला सांगितलच की मी संशोधक वृत्तीचा माणूस आहे. मग मी शोध घ्यायचा सुरुवात केली, शिव्या का आणि कशा दिल्या जातात.
माझे एक मित्र आहेत. कधीही आणि कुठेही भाषणाला उभे करा, एक नंबर भाषण. पण स्टेजवरून खाली उतरले, आणि नेहमीच्या मित्रमंडळीत आले कि प्रत्येक वाक्यात आई घालणारच. प्रत्यक्षात त्यांचे त्यांच्या आईवर खुप प्रेम आहे. आईला जरा काही झालं तर यांचा जीव तळमळतो. माझे दुसरे एक मित्र यांच्यापेक्षा सभ्य आहेत. जोपर्यंत ते घरात शिरत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या तोंडून असा कसलाही शब्द चुकूनही बाहेर पडत नाही. एकदा घरात शिरले आणि घराचा दरवाजा बंद झाला की वाक्यावाक्याला आईची आठवण. बहुतेक आई तिकडे उचक्या लागून हैराण होत असेल. घराबाहेर पडताना ते पुन्हा एकदा सभ्य माणसाचा बुरखा घालून बाहेर पडतात.
या झाल्या सवयीमुळे होणाऱ्या गोष्टी.
पण शिव्या हे शस्त्र आहे आणि हे शस्त्र वापरण्याचे एक शास्त्र आहे. यातले जे तज्ञ असतात ते याचा व्यावसायिक वापर करतात.
एका साखर कारखान्यात संचालक मंडळाची मिटींग चालु होती. एका संचालकांना एक विषय त्यांच्या मनासारखा मंजूर करून घ्यायचा होता. अध्यक्षांना तस होऊ द्यायचे नव्हते. दोघेही तरबेज राजकारणी. फक्त संचालक शिव्यांच्या संस्कृतीतले तज्ञ होते आणि अध्यक्ष नव्हते. अध्यक्षांनी बराच युक्तिवाद करुन बहुतांशी संचालकांना आपल्या बाजुला घेतले. डाव हातचा जातोय अस दिसताच या संचालकांनी एक ठेवणीतील कचकचीत शिवी बाहेर काढली. ती ऐकल्यावर अध्यक्षांचा सगळा युक्तिवाद ढासळला. संचालकांच्या मनासारखा ठराव झाला आणि संचालक कारखान्याच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले.
शिवीचे शस्र असं कामाला येत. या तज्ञ लोकांनी खरं तर या विषयावर क्लासेस सुरू केले पाहिजेत. खुप चालतील.
दोन भाऊ भाऊ एकमेकांशी हमरीतुमरीवर आले होते. दोघेही आईची आठवण काढत होते. एक म्हणत होता. ” तुझ्या आई…….. ” दुसरा पण ” तुझ्या आई……” आपल्या दोघांची आई एकच आहे, हे त्या रागात दोघेही बहुतेक विसरले होते. त्यांची आईही तिथेच डोक्याला हात लावून बसली होती.
शिवी संस्कृतीतले व्यावसायिक तज्ञ सोडले तर शिवी हे दुबळ्यांचे हत्यार आहे. आपण आता समोरच्याचे काहीच करु शकत नाही असे लक्षात आले की मग माणूस दोन चार शिव्या हासडून मनातला राग बाहेर काढतो आणि मोकळा होतो. त्या अर्थाने शिवी ही मनात साठलेल्या भावनांचा निचरा करण्याचे एक साधन असते. पण समोरचा माणूस निगरगट्ट नसेल तर ती शिवी त्याच्या मनात रुतून बसते. एक शिवी दिली म्हणून दहा दहा वीस वीस वर्षे एकमेकांशी अबोला धरलेली माणसंही माझ्या पाहण्यात आहेत.
सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणूस शिवी देणाराला भितो ते यामुळेच. आपल्याला कुणी शिवी दिली तर आपला फार मोठा अपमान होईल या भावनेने तो कुठल्याही भांडणात हातचा राखूनच भाग घेतो. आणि याचाच अनेकजण गैरफायदा घेतात
पोलिस फार शिव्या देतात, गुन्हेगारांशी याच भाषेत बोलावे लागते असे लोक म्हणतात. पण मी स्वत: कोणत्याही पोलिसाला शिव्या देताना ऐकलेले नाही. बहुतेक त्यांची आणि माझी चुकामुक होत असावी. काही बायका अस्सल शिव्या देत असल्या तरी याही क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी आहे. आणि बहुतेक शिव्या या आई बहिणीवरूनच असतात. कोकणात काही ठिकाणी बापावरुनच्या काही शिव्या प्रचलित आहेत हा एक अपवादच म्हणायचा.
असो, तर असे हे शिवीपुराण शेवटी गौतम बुद्धाच्या एका गोष्टीने संपवतो. गौतम बुद्धांना एका माणसाने खुप शिवीगाळ केली. पण बुद्धांनी त्याला काहीच उत्तर दिले नाही. अखेर तो माणूस निघून गेला. बुद्धांच्या एका शिष्याने त्यांना विचारले, ” या माणसाने तुम्हाला ऐवढ्या शिव्या दिल्या पण तुम्ही काहीच बोलला नाहीत.” बुद्ध त्याला म्हणाले, ” त्याने दिल्या पण मी त्या घेतल्या नाहीत, त्यामुळे त्या परत त्याच्याकडेच गेल्या.”
शेवटी काय घ्यायच ते आपणच ठरवायचं.
( या लेखावरील प्रतिक्रिया 9881098138 या व्हाटसएप नंबरवर पाठवाव्या ही विनंती )