सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची काल इंदापुरात सभा झाली. या सभेपूर्वी त्यांनी काही शाखांची उद्घाटन केली. या कार्यक्रमादरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते रंजनकुमार तावरे यांच्या गळ्यातील पावणे तीन लाखांची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी रंजनकुमार तावरे यांनी इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून, या घटनेने मात्र इंदापुरात खळबळ उडाली आहे. काल रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
इंदापूर नगरपरिषदेसमोरील मैदानाकडे सभेसाठी रंजनकुमार तावरे पायी चालत जात होते. यावेळी जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ते न्यायालयासमोरील चौक यादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन रंजन तावरे यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरून नेली.