नांदेड : महान्यूज लाईव्ह
मुलींच्या लग्नाची चिंता आता अलीकडे बापाच्या चिंतेचा विषय बनत नाही, हे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. मात्र अजूनही मराठवाड्यातील अनेक बाप त्यांच्या अल्प उत्पन्नामुळे या चिंतेत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या किनवट भागातील एका शेतकऱ्याने मुलींची लग्न व वाढत्या कर्जाचा बोजा यातून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पांगरी तांडा येथील नंदू जाधव या 37 वर्षीय शेतकऱ्याने शुक्रवारी 24 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपली इहलोकीची यात्रा संपवली.
नंदू जाधव हे चालक म्हणून काम करत होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या. मुली लग्नाला आल्याने त्यांची लग्न कशी करायची? त्या लग्नाचा खर्च कसा करायचा? याची चिंता त्यांना सतावत होती.
फक्त खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत असताना मिळणारा पैसा हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरत नव्हता. त्यामुळे अगोदरच घेतलेली कर्जे देणे होत नसल्याने देखील नंदू यादव हे चिंतेत होते. या साऱ्या चिंतेला कंटाळून त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले.