राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कथित भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला, त्यांच्यामुळे मागील अनेक वर्षांपांसून सुरू असलेल्या भीमा पाटस बचाव लढायला गती मिळाली. त्याबद्दल मुंबई येथे जाऊन खासदार संजय राऊत यांचा सत्कार केला अशी माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भीमा पाटस सहकार बचाव समितीचे नामदेव ताकवणे यांनी दिली.
दौंड भाजपचे आमदार राहुल कुल हे अध्यक्ष असलेल्या पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहार आणि पाचशे कोटींच्या कथित भ्रष्टाचाराबाबत ईडी आणि सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राऊत यांनी केली होती. त्यामुळे मागील काही दिवसापासून दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांचा ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढुन निषेध केला होता. त्यावर माजी आमदार रमेश थोरात आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनीही खासदार संजय राऊत यांचे समर्थन करीत आमदार कुल यांच्यावर टीका केली. त्यामुळे आमदार कुळ समर्थक व संजय राऊत असा संघर्ष गेला शिगेला पोहोचल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भीमा सहकार बचाव समितीचे नामदेव ताकवणे यांनी नुकतीच मुंबई येथील सामना भवन येथे जाऊन खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. खासदार राऊत यांनी चौकशी होण्याची मागणी केली. त्यामुळे भीमा पाटसच्या कथित भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराची माहिती संपूर्ण राज्यभर पसरली. खऱ्या अर्थाने भीमा सहकार बचाव समितीने जो लढा चालू ठेवला होता त्याला अधिक गती मिळाली. अशी प्रतिक्रिया नामदेव ताकवणे यांनी राऊत यांना बोलून दाखवली.
यावेळी भीमा सहकार बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांचा सत्कार केला. भिमा सहकारी साखर कारखान्याबाबत गेली २०१६ पासून पाठपुरावा चालू होता, सरकारच्या व सहकार विभागाच्या प्रादेशिक साखर संचालकाच्या स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली होती, याबाबत माहिती घेण्यासाठी पाठपुरावा चालू होता, याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे न्यायालयात दाद मागितली आहे. अशी माहिती ताकवणे यांनी खासदार संजय राऊत यांना यावेळी दिली. तसेच खासदार संजय राऊत यांनी भीमा कारखान्यास भेट देण्याचे निमंत्रण यावेळी ताकवणे यांनी राऊत यांना दिले.