पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रोडरोमिओंवर कोतवाली पोलिसांनी जोरदार कारवाई
नगर – महान्यूज लाईव्ह
बारामती, भिगवण आणि त्यानंतर नगर जिल्ह्यातीलच कर्जत तालुक्यात कायद्याचा वचक निर्माण करणाऱ्या पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आता आपला दरारा नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू केला आहे. जिथे जाऊ, तिथे त्याच धर्तीवर काम करू असा जणू यादव यांचा अजेंडाच बनला आहे.
आज देखील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमियोंना अगदी हुडकून काढून कोतवाली पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. या मोहिमेत १८ जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे.
नगर येथील वाडीयापार्क व परिसरात राहणाऱ्या महिला, फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, व्यायामासाठी, फिटनेससाठी येणाऱ्या महिल, कोचिंग क्लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून त्रास दिला जात होता. काही रोडरोमिओ हे जोरात मोटारसायकल चालविणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, रस्त्यावर वाहने लावून वाढदिवसाचे केक कापणे, मुलींच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या तसेच पाणी फेकणे तसेच वाडीयापार्क परिसरात दारु पिऊन तेथेच बाटल्या फेकणे तसेच मुलींचे पालक त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर त्यांचे अंगावर पाणी फेकणे अशा स्वरुपाचा त्रास देत होते.
कोतवाली पोलीस ठाण्यात पालकांनी, महिलांनी तक्रारी केल्या आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मागदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी मोहिम हाती घेतली.
सुरवातीला वाडीयापार्क, टिळकरोड, वाडीयापार्क मैदानाच्या बाहेरील दुकानाच्या रांगेसमोर गस्त घालत वेगात गाडी चालवणारी व गोंधळ घालत असणारी मुले ताब्यात घेतली. या परिसरातील विनाकारण फिरणाऱ्यांना कोतवाली पोलिसांकडून समज देण्यात आली.
गोंधळ घालणाऱ्या सोळा जणांवर मुंबई पोलीस कायदयाप्रमाणे खटले दाखल केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे, अतुल काजळे, अशोक कांबळे, सतीश भांड, अशोक सायकर आदींनी केली.
कोणी त्रास दिला, तर यादवसाहेबांच्या मोबाईलवर फोन करा..
वाईट उददेशाने महिला व मुलींच्या मागे फिरणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, वारंवार फोन करणे, फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्रामवर वारंवार मेसेज करणे, प्रवासात वाईट उददेशाने स्पर्श करणे, वेगवेगळे हातवारे करणे असा कोणत्याही प्रकारे त्रास दिल्यास कोतवाली पोलीस ठाण्याच्या ०२४९/२४१६११७ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या ७७७७९२४६०३ या क्रमांकावर टेक्स मॅसेज अथवा व्हॉटसअप मेसेज करुन तक्रार करा असे आवाहन खुद्द यादव यांनी केले आहे.