सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर शहरातील काही विकासकामांची म्हणे २०२२ मध्ये मागणी केली. दुसरीकडे ती कामे मंजूर झाली, मात्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी थेट हर्षवर्धन पाटलांच्या नावाने कामाच्या मंजूरीचे पत्र दिले. दोन्ही पक्षात श्रेयवादाचं युध्द रंगलं असतानाच तिकडे राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांनाच आपल्या बॅनरमध्ये घेतलं..
इंदापूर तालुक्यात दिल्लीपेक्षा मोठा गोंधळ सुरू आहे. या दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू असून जिल्हा नियोजन मंडळात सदस्य झाल्यापासून हर्षवर्धन पाटील यांनीही कंबर कसली आहे. दुसरीकडे कोणतेही काम मंजूर करताना आमदारांचाच लॉगिन आयडी लागतो असे ठामपणे सांगत दत्तात्रेय भरणे मात्र आपणच कामे मंजूर करतो असे सांगताहेत.
कालच इंदापूर शहरातील काही मंजूर कामांवरून भाजप व राष्ट्रवादीमध्ये अगोदर श्रेयवाद रंगला. मग मंजूरीच्या कामांच्या पत्रांची प्रसारमाध्यमांसमोर चिरफाड झाली. मग आज इंदापूर शहरातल्या संबंधित प्रभागातल्या नगरसेवकांनी कामांची यादी आमची असल्याचे सांगितले. त्यानंतर मग भाजपने पत्रकार परीषद घेतली.
या साऱ्या गदारोळात अचानकच एका बॅनेरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या बॅनरवर ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार होतेच, मात्र त्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही होते आणि पाटलांचेच कौतुक या बॅनरमध्ये करण्यात आले होते की, त्यांनी हा निधी दिला. मात्र आम्ही मागणी केली, म्हणून भरणेमामा व प्रदीप गारटकरांचेही आभार अशा आशयाचा हा फलक होता.
राष्ट्रवादीच्या बॅनरवर पहिल्यांदाच चंद्रकांत पाटलांचे कौतुक झाल्याने साहजिकच त्याची चर्चा अधिक झाली नसली तरच नवल. एकूणच इंदापूर तालुक्यातले राजकारण जसजशा निवडणूका जवळ येताहेत आणि जसजसे भाजपचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटलांना रसद पुरवताहेत, तसतसे वातावरण आणि राजकारण दोन्हीही तापत चालले आहे.