वेळे ते गुळुंब रस्त्यावर अपघातात वाईतील दोन तरुणांचा जागीच मृत्यू! नातेवाईकांसह मित्रांचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील वेळे ते गुळुंब रस्त्यावरील नवीन पुलाच्या बांधकामाचा अंदाज न आल्याने वाईतील दोन तरुणांचा दुचाकी वरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
बुधवार (दि.२२) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास प्रमोद गंगाराम यादव (वय २० वर्ष राहणार यशवंत नगर वाई) व प्रथमेश संतोष खैरे (वय २० रा. बुरुडगल्ली वाई) या दोघांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला. हे दोघे दुचाकीवरुन वेळे गावाकडून गुळुंब गावाकडे जात होते.
रस्त्यावर सुरु असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचा अंदाज न आल्याने दुचाकी पुलाच्या संरक्षणासाठी केलेल्या पत्र्याच्या कुंपनाला जोरात धडकली. अंदाजे १० फुट ऊंच उडून हे दोघेजण पलिकडच्या पुलाच्या भिंतीवर जावून आदळले व १० फुट खोल ओढ्यात कोसळल्याने दोघेही जागीच ठार झाले.
घटनेची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांना समजताच ते रुग्णवाहिकेसह अपघात स्थळी सहकारी पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, हवालदार चंद्रकांत मुंगसे, राजाराम माने, मोहिते, सहाय्यक फौजदार किर्दक यांच्यासह अपघात स्थळी पोहचले. त्यांनी नागरीकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.
नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून दोघांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी प्रथमेश व प्रमोद ला मृत घोषित केले. या दोघांचेही मृतदेह पाहून अपघातस्थळावर नातेवाईकांसह मित्रांचा अश्रूंचा बांध फुटला. अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असुन त्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.