पुणे – नगर महामार्गावर नगर हद्दीत झालेल्या अपघातात आमदाबाद येथील ४ जणांचा मृत्यू
शिरूर (महान्यूज लाईव्ह): गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवदर्शनासाठी गेलेल्या आमदाबाद (ता.शिरूर) येथील भाविकांचा परतीच्या प्रवासावेळी अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील भाविक बुधवारी ( दि.२२) देवदर्शनासाठी देवगड व शनी शिंगणापूर येथे गेले होते. देवदर्शन करून परतत असताना रात्री सव्वा बाराच्या सुमारास पुणे -नगर महामार्गावर सुपे ते कामरंगावच्या दरम्यान चौधरी ढाब्याजवळ कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यावेळी कंटेनर भाविकांच्या गाडीवर आदळला असून कंटेनरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघातात आमदाबाद येथील राजेंद्र विष्णू साळवे (वय ३३ वर्ष), विजय राजेंद्र अवचिते (वय २६ वर्षे), धीरज मोहिते (वय १० वर्षे), मयुर संतोष साळवे ( वय २५ वर्षे), यांचा मुत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर अ.नगर येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे.