भाऊला तलवारी ने केक कापणे महागात पडले..! पोलिसांनी त्याला उचलून आणला व इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – वाढदिवसाच्या नावाखाली अनेक युवकांची पावले चुकीच्या दिशेने वळताना दिसत आहेत.. ..’बर्थ डे आहे भावाचा..जल्लोश सा-या गावाचा..अशा शुभेच्छा देत मित्रही जोरात बर्थ डे साजरा करतात..आपण आपल्या भागातला भाई आहोत, हे इतरांना थाटात दाखवून देण्याच्या नादात फसले जातात.. इंदापूर तालुक्यातही तलवारीने केक कापणाऱ्या एका २८ वर्षीय युवकावर इंदापूर पोलिसांनी कारवाई केली.. त्या बर्थ डे बॉय’ ला उचलून आणला व गुन्हा दाखल करत त्याची मस्ती उतरवली..
सचिन दिलीप सातव (रा. बिजवडी, ता. इंदापूर) असे या बर्थ डे साजरा करणा-या युवकाचे नाव असून, त्याला इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मंगळवारी (२१ मार्च) रात्री ९ वा. १५ मिनिटांच्या आसपास तलवारीसह ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आर्म ॲक्ट कलम २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सचिन सातव या युवकाने सोमवारी (२१ मार्च) तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. त्या वाढदिवसाला तलवार हातात घेऊन सेलिब्रेशन करतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर वायरल केला.
वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापल्याची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई संदर्भात सूचना दिल्या होत्या. गुन्हे शोध पथकातील सहायक निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, सलमान खान, नंदू जाधव, विनोद लोखंडे यांच्या पथकाने या युवकाला त्याच्या घरातून तलवारीसह ताब्यात घेतले. या युवकावर अवैधपणे, तथा विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल नंदू बाळू जाधव यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.