केज – महान्यूज लाईव्ह
आई ज्वारी काढण्यासाठी शेतात निघाली, म्हणून तिच्यापाठोपाठ तिचा चिमुकला आणि त्याची दोन सख्खी चुलतभावंडंही शेतात पोचली.. जेवणं झाली.. या तिघांना एका झाडाखाली बसवून घरातली सगळी मंडळी ज्वारी काढण्यात गुंतली..आणि इकडे खेळता खेळता एक हौदात पडला, त्याला वाचवायला दुसरा.. तिसरा असे करत या घरातील सारेच वंशाचे दिवे बुडाले..!
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेत स्वराज जयराम चौधरी (९ वर्ष), पार्थ श्रीराम चौधरी (७ वर्ष) आणि कानिफनाथ उर्फ श्लोक गणेश चौधरी (७ वर्ष) या तीन मुलांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच युसूफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आणि गावात एकच हल्लकल्लोळ झाला.
पिकांना लागणारे पाणी साठवायला हा छोटा हौद चौधरी कुटुंबियांनी बांधला होता. त्यात ५ फूट पाणी होते. पोहायला येत नसल्याने या तिघांनाही आपला जीव गमवावा लागला. सकाळी कुटुंबियांबरोबर रानात पोचलेल्या या चिमुकल्यांसोबत घरच्यांनी जेवण घेतले. दुपारचं जेवण संपल्यानंतर या तिघांना एका झाडाखाली बसायला सांगितले आणि सारे ज्वारी काढण्यात मग्न झाले आणि इकडे काळाने डाव साधला.