बारामती – महान्यूज लाईव्ह
१८ मार्च रोजीची घटना.. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील दिलीप इश्वर सावंत यांना प्रसाद संजय टकले (वय 26 वर्ष सध्या तात्पुरता मुक्काम प्रगतीनगर, शेळकेवस्ती बारामती, मूळ रा. अहमदनगर) याने मोबाईलवरून माहिती दिली की, त्याच्याकडे दोन नंबरमधून कमवलेले लाखो रुपये आहेत, तुम्ही आम्हाला जेवढे पैसे द्याल, त्याच्या दुप्पट आम्ही तुम्हाला पैसे देतो..आणि तेथून ही दोन नंबरवाल्यांची फसवाफसवी सुरू झाली..
सावंत यांचा मुलगा अभियंता आहे.. त्यांना या टकलेने अनेकदा फोन केले..कमी कष्टात पैसे अधिक मिळणार असल्याची त्यांना खात्री पटली आणि टकलेचे काम सोपे झाले. या टकलेने त्या्ंना बारामतीत फलटण रोडवर बोलवले.
त्यापूर्वीच त्याने नातेपुते, फलटण या ठिकाणी सुद्धा बोलवले, परंतु त्या ठिकाणी तो भेटला नाही, अखेर त्याने फलटण रोड बारामती येथे बोलवले. सावंत हे ३ लाख ९५ हजार रुपये घेऊन आले.
टकले हा देखील एका बॅगेमध्ये वह्या व दुसऱ्या बॅगेत नोटांचे बंडल घेऊन आला. तो ह्युंडाई आय टेन गाडी (क्रमांक एम एच ०९ बीबी 43 07) मध्ये आला. गाडीच्या डिकीमध्ये रस्त्यातच दोन्ही बॅगा फिर्यादी यांना दाखवण्यात आल्या. आणि त्यांना सांगण्यात आले की यात लाखो रुपये आहेत, तुम्ही जेवढे द्याल त्याच्या दुप्पट देणार असे त्याने सांगितले.
सावंत व टकले याच्यात बराच वेळ चर्चा झाली. अगोदर पैसे कोणी द्यायचे यावर ही चर्चा सरू होती. सावंत हे टकले याला बॅग खोलून दाखव व पैसे मोजून दे असे सांगत होते. तेवढ्यात याची माहिती शहर पोलिसांना समजली आणि त्यांनी तेथे धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. सावंत, त्यांचा मुलगा व प्रसाद टकले या तिघांनाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर सारा प्रकार पोलिसांना समजला. टकले याच्याकडील बॅग खोलून पाहिल्यानंतर या बॅगमध्ये नोटांची बंडले दिसली, मात्र निरखून पाहिल्यानंतर पाचशेची एक नोट व बाकी झेरॉक्स, त्याखाली खेळण्यातील बॅंक ऑफ चिल्ड्रन्स इंडिया या नावाची खेळण्यातल्या नोटा दिसून आल्या.
पोलिसांनी टकले याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, दरम्यान यातील अधिक तपासात या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा गौतम पाटील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपीची कार जप्त करून कागदी झेरॉक्सच्या नोटा जप्त केल्या आहेत. बनावट सोने दाखवून, मॅजिक मनी दाखवून पुलिंग राईस करून टकले हा आजवर फसवत होता असेही तपासात उघड झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर, संजय जाधव, तुषार चव्हाण, शाहू राणे, अशोक जामदार, अक्षय सिताफ यांनी केली.