दौलतराव पिसाळ -महान्यूज लाईव्ह
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात गुरेघर धरणाजवळ रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास गोळीबार झाला व दोन जणांचा मृत्यू झाला. मोरणा गुरेघर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडविणाऱ्या घटनेत मदन नारायण कदम याच्यासह त्यांची दोन मुले गौरव मदन कदम (वय- २५), योगेश मदन कदम (वय- २२) व पत्नी निता मदन कदम (वय- ४५) अशा चौघांना पाटण पोलिसांनी अटक केली. त्यांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
ठाणे महापालिकेचा माजी नगरसेवक मदन नारायण कदम (वय-५७ , मल्हारपेठ ता. पाटण) याने अंगावर गाडीचा धुरळा का उडवला? या कारणावरून झालेल्या पाच दिवसांपूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जाब विचारण्यास आलेल्या तिघाजणांवर गोळीबार केला. यामध्ये श्रीरंग लक्ष्मण जाधव वय-४५, सतिश बाळू सावंत वय- ३५ हे दोघेजण जागीच ठार झाले तर फिर्यादी प्रकाश लक्ष्मण जाधव वय- ४३ हे गंभीर जखमी झाले.
याबाबत पाटण पोलिसांनी अधिक दिलेली माहिती अशी व या घटनेबाबत फिर्यादी प्रकाश लक्ष्मण जाधव (रा. कोरडेवाडी (धावडे, ता. पाटण) यांनी पाटण पोलिसांना फिर्याद दिली. १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादीचे भाऊ सखाराम लक्ष्मण जाधव (वय- ५२ रा. कोरडेवाडी) आणि मदन नारायण कदम (रा. सध्या रा. शिद्रुकवाडी) यांच्यात मोरगिरी – गुरेघरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भवानी मंदिर येथे गाडीचा धुरळा अंगावर उडाला म्हणून पाच दिवसांपूर्वी वादावादी झाली.
या वादात मदन कदम सह मुले गौरव मदन कदम व योगेश मदन कदम यांनी सखाराम जाधव यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या वादावादीची तक्रार पाटण पोलिसात १५ मार्च रोजीच दाखल आहे.
या वादाचा जाब विचारण्यासाठी सखाराम लक्ष्मण जाधव याचे भाऊ श्रीरंग जाधव, प्रकाश जाधव, सतिश सावंत रविवारी (दि. १९ मार्च रोजी रात्री ८ वा. सुमारास) मदन नारायण कदम याच्या शिद्रुकवाडी येथील शेती फार्महाऊसवर गावातील काही लोकांबरोबर गेले होते.
यावेळी झालेल्या वादावादीत हमरीतुमरी होऊन दोन्ही गटात मारामारी सुरु झाली. या मारामारीत मदन नारायण कदम याने डबल बार बंदुकीतून श्रीरंग जाधव, प्रकाश जाधव व सतिश सावंत यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात श्रीरंग जाधव, सतिश सावंत हे दोघेजण जागीच ठार झाले. तर प्रकाश जाधव हा गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी एकच हाहाकार झाला.
गोळीबार झाल्याने आलेले इतर लोक पळून गेले. या घटनेची खबर पाटण पोलिसांना समजताच घटनास्थळी जिल्याचे पोलीस प्रमुख समीर शेख, सहाय्यक एसपी बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलिस निरीक्षक विकास पाडळे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असता पोलिसांनी मदन नारायण कदम याच्यासह दोन मुले पत्नी यांना अटक केली. पत्नी निता मदन कदम हिच्यावर आरोपीस बंदूक आणून दिल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.