सोमेश्वरनगर – महान्यूज लाईव्ह
बारा वर्षापूर्वीची ही घटना असली तरी बारामती तालुक्यात व पुरंदर तालुक्यात या पतसंस्थेची मोठी चर्चा आहे. सन २०१० -११ मध्ये सोमेश्वर ग्रामीण पतसंस्थेकडून बेकायदेशीर ४७ लाखांची कर्जप्रकरणे करुन संस्थेची फसवणूक केल्याच्या प्रकरणात संस्थेचा तत्कालीन सचीव संपत गंगाराम बनकर याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.
अडीच महिन्यांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलीसानी त्याला अटक केली होती. बनकर याला भारतीय दंड सहिता ४०९ ,४२० व ३४ च्या गुन्हयाखाली अटक करण्यात आली होती.
बारामती येथील जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी त्याच्या वकीलांनी अर्ज केला. तेथे झालेल्या सुनावणीत ही कर्जे पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने मंजूर केली होती. सचीव हा चेअरमन व संचालक मंडळाच्या आदेशानुसार काम करीत असल्याचा युक्तीवाद ॲड. डॉ. उदय वारुंजीकर ,ॲड. गणेश आळंदीकर व ॲड. आदीत्य खारकर यांनी केला .
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. बोरकर यांचेसमोर ही सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी बनकर याला जामीन मंजूर केला.