मुंबई -महान्यूज लाईव्ह
बागेश्वर धाम येथील बहुचर्चित बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या मुंबईतील मीरा रोड येथील दिव्य दरबारात गेलेल्या ३६पेक्षा अधिक महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. पोलिसांनी केलेल्या किमतीनुसार तब्बल ४ लाख ८७ हजारांचा मात्र प्रत्यक्षात सध्याच्या सोन्याच्या भावानुसार २५ लाखांचा डल्ला चोरट्यांनी मारला असून कथित आत्मज्ञान तपासण्यासाठी गेलेल्या भाविकांनाच चोर शोधण्यासाठी पोलिसांच्या दरबारात जावे लागले.
मीरा रोड येथे कार्यक्रमात सुनिता दिलीप गवळी या बोरीवलीतील महिलेमुळे या दरबारात चोऱ्या झाल्याच्या घटनेला तोंड फुटले. त्यानंतर मीरा रोड पोलिस ठाण्यात भाविकांनी एकच गर्दी केली. आतापर्यंत ३६ महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली आहे.
विशेष म्हणजे एक तोळा सोन्याच्या दागिन्याची किंमत १० हजार रुपये पोलिसांनी केल्याने हा आकडा सध्या तरी ४ लाख ८७ हजारांवर पोचला आहे, मात्र खरोखरच ५० हजार रुपये तोळ्यानुसार केला, तर त्याची किंमत २५ लाख रुपयांवर पोचू शकते.
धीरेंद्र शास्त्री याचा दोन दिवस मीरा रोड येथे दरबार होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारीच ५० हजार हून अधिक भाविकांनी या दरबारात हजेरी लावली होती असे सांगितले जात आहे. आता मात्र या दरबाराऐवजी त्यात चोरीला गेलेल्या दागिन्यांचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे.