रामभाऊ जगताप – महान्यूज लाईव्ह
गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, मग संशयितांची नावे पुढे आली, आपल्यावर नाव घेतल्याचा राग मिसरूड न फुटलेल्या पोरांना एवढा आला की, त्यांनी पोरं सोरं गोळा केली आणि जो आधीच चिंतेत आहे, त्याच्याच गाडीवर हल्ला केला, गाडी फोडली. त्या घरातल्या एकाला मारहाणही केली.. मग अख्खं गाव संतापलं.. गावानं पोरांना धडा शिकवला..
काल रात्री बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावात मिसरूड न फुटलेल्या पोरांनी धिंगाणा घातला. यात एका गाडीचे नुकसान झाले. या गाडीच्या नुकसानीनंतर गावातील ग्रामस्थ संतापले. त्यांनी या पोरांच्या दुचाक्यांची मोडतोड केली. पोरांनाही धडा शिकवला. पोरं पळून गेली. पोलिसांनी या पोरांपैकी एका पोराला ताब्यात घेतले. मात्र प्रश्न संपलेले नाहीत.
घडलेल्या या घटनेने मुलींचे पालक असलेल्या पालकांपुढे गंभीर प्रश्न तर निर्माण केलाच, शिवाय मुलांच्या पालकांपुढेही अनेक प्रश्न वाढवून ठेवले आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या गंभीर प्रश्नात तातडीने हालचाल केली असती, पोस्कोसारखे गुन्हे दाखल झाले असते, तर नक्कीच काही तरी फरक पडला असता असे ग्रामस्थ म्हणत आहेत. आता तरी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे.