राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : खासदार संजय राऊत यांनी दौंड भाजपचे आमदार आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केलेल्या ५०० कोटींच्या कथित भ्रष्टाचारावर आवाज उठवल्याबद्दल दौंड तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर झळकले होते. मात्र आता आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांकडून खासदार संजय राऊत यांच्या निषेधाचे बॅनर लावण्यात आले आहेत आहेत.
खासदार संजय राऊत यांनी १३ मार्च रोजी भाजपचे आमदार व भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर कथित पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. राऊत यांच्या आरोपानंतर भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी खासदार संजय राऊत यांना टिकेचे लक्ष्य केले आहे.
कुल यांच्या समर्थकांनी तालुक्यात ठिकठिकाणी खासदार राऊत यांच्यावर टीका करत आंदोलन केले. त्यानंतर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे फलक मागील काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात झळकले. राऊत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस सहकार कारखान्याच्या ५०० कोटींच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. कर नाही तर डर कशाला चौकशीला सामोरे जा, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीने जाहीर आभार, अशा आशयाचे बॅनर शेतकरी सभासदांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लावले.
दरम्यान, दौंड शहरातील लावण्यात आलेले खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर विनापरवाना लावले असल्याचे सांगत दौंड नगरपालिकेने ते बॅनर काढून कारवाई केली. यावरून देखील राजकारण रंगले. शहरात इतरही विनापरवाना बॅनर लावलेले आहेत, मात्र त्यावर नगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. तालुक्यात इतर गावांमध्येही लावलेले बॅनर काढण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.
यावरून दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी याबाबत थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधला. आता खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर प्रकरण ताजे असतानाच आता आमदार कुल यांच्या समर्थकांकडून खासदार राऊत यांचा निषेध करणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे सध्या खासदार संजय राऊत व आमदार राहुल कुल यांच्यातील आरोप पत्यारोपांचा राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे चित्र आहे.