किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
भवानीनगर – संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निमित्ताने एकीकडे भूसंपादन जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे जुन्या रस्त्यातील झाडे काढली गेली आहेत.. आता रस्त्याचे काम जसजसे जवळ येतेय, तसतशी रस्त्याकडेची बांधकामे हटवली जात आहेत.. काटेवाडीत मात्र एक नवीनच प्रयोग सुरू आहे, तसा तो प्रयोग इतरत्र वापरला जातो, मात्र या भागात नवीनच असल्याने त्याचे कुतूहल अधिक आहे.
काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलाणी यांची ३ हजार फूट दुमजली इमारत चक्क ९ फूट मागे सारली जाणार आहे त्याचे काम गेल्या महिन्यापासून अव्याहतपणे सुरू आहे, आता हे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून ९ फूट मागे घेतली जाणार आहे.
यासाठी हरियाणातून खास प्रशिक्षित ठेकेदाराला आणण्यात आले असून मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांमधील १ हजारहून अधिक इमारती मागे घेतल्या आहेत अथवा इतरत्र नेल्या आहेत. ज्या आडव्या इमारती होत्या, त्या सरळ करून दिल्या आहेत.
काटेवाडीतील मासाळवाडीत हा प्रयोग सुरू आहे. मुलाणी यांनी सांगितले की, इमारत रस्त्याच्या अगदी कडेला येत होती. पाठीमागे जागा शिल्लक होती. ही इमारत पाडायला देखील मोठा खर्च येत होता. नव्याने इमारत उभी करायची झाल्यास ५० लाख रुपये खर्च आला असता. मग यू ट्यूबवर सर्च केले आणि हरियाणातील या लोकांचा शोध लागला.
मग या लोकांशी संपर्क साधला. त्यांनी १० लाख रुपये खर्च सांगितला आहे. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊन त्याचा पुनर्वापर करता येणे शक्य असल्याने हा पर्याय निवडला. योगायोगाने पाठीमागे दहा फूट जागा शिल्लक असल्याने हे शक्य झाले असे मुलाणी यांनी सांगितले.