शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर शहरात विशेष मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या राणी चोरे यांच्या कन्येचे विशेष मुलांच्या कार्यक्रमातच दुर्दैवी निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर असे की,शिरूर शहरात आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही विशेष मतिमंद मुलांसाठी संस्था गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे.या संस्थेच्या संस्थापिका राणी ताई चोरे यांच्या दोन्ही मुली आकांक्षा (वय.२१)आणि समीक्षा(वय.१९) यांना एमपीएस या दुर्धर आजाराचे निदान वयाच्या सहाव्या वर्षी करण्यात आले.
या मुलींच्या प्रेरणेतून त्यांनी आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित विशेष मतिमंदत्व असलेल्या सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, ऑटीझम अशा विविध मुलांना समाजात सन्मानाने जगता यावे साठी प्रशिक्षण दिले जाते, तसेच संगोपन करण्याचे काम केले गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे.
संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांची द्वितीय कन्या समीक्षा ही गेल्या काही दिवसांपासुन एमपीएस आजाराशी झुंज देत होती. कुठलाही वैद्यकीय इलाज होत नसल्याने डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेचा सातवा वर्धापनदिन बुधवार (दि.१५) रोजी सायंकाळी शिरूर शहरातील नगरपालिका मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या संस्थेचा विशेष मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना समीक्षा ही अचानक अत्यवस्थ झाली. रक्ताच्या उलट्या सुरू झाल्यानंतर तिला तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
एकीकडे संस्थेचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे संस्थेच्या संस्थापिका राणी ताई चोरे यांची कन्या समीक्षा हीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता कळताच संपूर्ण सभागृहात दुःखाची लाट पसरली. क्षणात संपूर्ण वातावरण गंभीर बनून गेले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात डोंगरगण येथे अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. समीक्षा हिच्या निधनाने संपूर्ण शिरूर शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.