राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात मागील तीन – चार दिवसांपासून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आमदार राहुल कुल समर्थकांनी जोडमारो, पुतळा दहन, निषेध मोर्चा करून आंदोलने सुरू केली आहेत. मात्र खासदार राऊत यांच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनापासून भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी या आंदोलनापासून लांब राहणेच पसंत केले.
त्यामुळे खासदार राऊत यांच्या विरोधात सुरू असलेल्या हे आंदोलन केवळ आमदार कुल समर्थकांचे आंदोलन ठरले,अशी चर्चा सध्या दौंड शहरासह तालुक्यात आहे. खासदार संजय राऊत यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचा आरोप करीत ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशीची करण्याची मागणी १३ मार्चला केली होती.
राऊत यांच्या आरोपानंतर आमदार राहुल कुल यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा करीत कुल समर्थकांनी दौंड तालुक्यात राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करणे, जोडो मारो, गाढवावरून धिंड काढणे अशी आंदोलने केली.
गुरुवारी (दि. १६) दौंड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारीया यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहरातून निषेध मोर्चा काढला. कुल समर्थकांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु मागील अनेक वर्षापासून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे हे आमदार राहुल कुल व संचालक मंडळावर करीत असलेल्या कारवाईच्या मागणीला पुन्हा एकदा ताकद मिळाली आहे. तर माजी आमदार रमेश थोरात यांनीही खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना या गैरव्यहारा संदर्भातील कागदपत्रे पुराव्यानिशी देणार असल्याची माहिती दिली.
त्यानिमित्ताने भीमा पाटसचा कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा तालुक्यातील गावगावात पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. खासदार राऊत यांनी केलेले आरोप आमदार कुल व त्यांच्या समर्थकांना चांगलेच जिव्हारी लागल्याचे चित्र त्यांच्या आंदोलनावरून दिसून येत आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनात भाजपचे तानाजी दिवेकर वगळता भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे,प्रवीण परदेशी, तसेच दौंड शहरासह तालुक्यातील इतर भाजप निष्ठावंत कार्यकर्ते या आंदोलनापासून लांबच राहिले.
पारदर्शक कारभार करणाऱ्या भाजप आमदारांवर झालेल्या आरोपामुळे सध्या दौंड तालुक्यात वादळ उठले आहे, असे असताना भाजपचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात का उतरले नाहीत हा एक सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी आमदार कुल यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.
त्यामुळे आंदोलनात सहभागी न झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा नामदेव ताकवणे यांना छुपा पाठिंबा तर नाही ना ? किंवा खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार कुल यांच्या वर केलेले आरोपांमध्ये तथ्य तर नाही ना ? तथ्य असल्यामुळेच तर ते या आंदोलनात सहभागी झाले नाही ना ? अशा अनेक प्रश्नांवर तालुक्यात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.