बारामती – महान्यूज लाईव्ह
कायदा कधीकधी कोणती पायरी गाठतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा..! मोटर सायकलवरून घसरून वडिलांच्या झालेल्या मृत्यूस वडील कारणीभूत असल्याने मुलाने वडीलांविरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मुलाने तक्रार दाखल केली आहे. ही घटना २ डिसेंबर २०२२ रोजी घडली. दुचाकी घसरून अपघात झाला आणि उपचारादरम्यान ७० वर्षीय वडीलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला, स्वतःच्या मृत्यूला व दुचाकीच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याबद्दल मुलाने मयत वडीलांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनीही मेलेल्या वडीलांविरोधात मरणोत्तर भारतीय दंडविधान कायदा कलम 279, 337, 338, 304(अ), सह मोटार वाहन कायदा कलम184 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.
बारामती तालुक्याच्या निंबूत गावच्या हद्तीत असलेल्या निंबूत बंधाऱ्यावरून ७० वर्षीय वडील हे दुचाकीवरून निघाले होते. दुचाकीवरून भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दुचाकी स्लिप झाली व दुचाकीसह वडील बंधाऱ्यात पडले.
या अपघातात वडीलांच्या डाव्या मांडीचे हाड फॅक्चर झाले, तसेच डाव्या पायाच्या पंज्यावर, घोट्याजवळ आणि डोक्यास गंभीर इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान 5 डिसेंबर 2022 रोजी वडीलांचा मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले. आता या अपघातास आपले वडील हेच कारणीभूत व जबाबदार होते, त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळेच ते स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरले व दुचाकीचेही नुकसान त्यांनीच केले अशा आशयाची ही फिर्याद मुलाने वडीलांविरोधात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.