दौंड – महान्यूज लाईव्ह
पुणे आणि मुंबई येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या व दक्षिण भारतातून पुण्याकडे जाणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान ३६ रेल्वे गाड्या दौंड जंक्शनला थांबत नसल्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गाड्यांना दौंड रेल्वे जंक्शनवर थांबा मिळावा, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
शिर्डी येथून अहमदनगरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना दौंड हे रेल्वे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांना दौंड येथे थांबा देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे सुळे यांनी म्हटले आहे.
इंदापूर, बारामती, श्रीगोंदा , फलटण, रांजणगाव, शिरवळ या परिसरात जाण्यासाठी वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतू दौंड रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाड्या पुण्यात पकडाव्या लागतात.
प्रवाशांची ही मोठी गैरसोय टाळण्यासाठी दौंड स्थानकावर या सर्व गाड्या थांबणे खुप महत्त्वाचे आणि सोयीचे आहे. याशिवाय दौंड स्थानकावर या गाड्यांना थांबा दिल्याने पुणे स्थानकावरील प्रवाशांचा बोजाही बऱ्यापैकी कमी होऊ शकेल, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे