दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाला बजावलेल्या नोटीशीमुळे एकच खळबळ उडाली आहे. यवत ग्रामपंचायतीत १५ लाख ७४ हजारांचा अपहार झाल्याचा ठपका ग्रामपंचायतीचा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर ठेवण्यात आला असून सरपंचाला ५ लाख रुपये व्याजासह सात दिवसांत भरण्याचे आदेश दिले आहेत.
दौंडचे गटविकास अधिकाऱ्यांनी यवतच्या सरपंच व ग्रमविकास अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात आदेश बजावला असून तत्कालीन सरपंच शामराव शेंडगे यांनी ही रक्कम सात दिवसांत ग्रामपंचायत कार्यालयात भरली नाही तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १७९ अन्वये प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यवत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी केकाण यांच्याविरोधात विभागीय चौकशी केल्यानंतर त्यांच्यावरील आरोप सिध्द झाले. ग्रामपंचायतीमध्ये संगनमताने १५ लाख ७४ हजार ४२० रुपयांचा अपहार निश््चित करण्यात आला., त्यानंतर केकाण यांना सक्तीने सेवानिवृत्त करणे व त्यांना देय असणाऱ्या निवृत्तीवेतनातून वसुलपात्र रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान अपहारातील उर्वरित ४ लाख ८८ हजार ५४४ रुपयांची रक्कम तत्कालिन सरपंच शामराव शेंडगे यांच्याकडून वसुल करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.