विक्रम वरे, बारामती.
या कहाणीची सुरवात होते, काटेवाडीतून.. मिलींद व नितीन काटे या दोन शेतकरी भावांची ही कहाणी.. स्वतः रस्त्यावर उन्हातान्हात थांबून शेतीचं उत्पन्न दुप्पट करून घेतलेली ही बळीराजाची यशोगाथा.. अगोदर अधिक क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या काटे कुटुंबाने स्वतः पिकवायचं व स्वतःच विकायचा निर्णय घेतला.. आणि आज गेली पाच वर्षे ते स्वतःच्या बागेतील द्राक्षे स्वतःच विकतात..थोडीथोडकी नव्हे त्यांनी तब्बल १२५ टनांहून अधिक द्राक्षे रस्त्यावर उभे राहून विकली आहेत..
काटेवाडीतील सविता फार्म हा श्रमाच्या पुजाऱ्यांच्या घामांनी अधिकच फुलला आहे, मागील पाच वर्षापासून या द्राक्षाच्या फार्मने जी कात टाकली, ती भल्याभल्या शेतकऱ्यांनाही अचंबित करणारी ठरली आहे. गेली पाच वर्षे मिलींद व नितीन काटे हे दोन भाऊ आपल्या द्राक्ष बागेतील उत्पादित द्राक्षे व्यापाऱ्यांना न देता स्वतःच रस्त्यावर विकतात. त्यांना रस्त्यावर द्राक्षे विकण्याचा फंडा सापडला आहे आणि एकूणच काटेवाडीतील अनेक शेतकरी आता याच मार्गाने आपापली उत्पादित द्राक्षे रस्त्यावर स्टॉल उभारूनच विकतात.
नोटबंदीने दिले आत्मनिर्भरतेचे बळ..
नोटबंदी झाल्यानंतर फळबागा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अंगात आलं. त्यांनी याचा दुहेरी फायदा घेतला. नोटबंदीमुळे उठाव नसल्याचे सांगत फळांचे दर पाडले, दुसरीकडे दोन लाखांपेक्षा अधिकची रक्कम रोख देता येत नाही असा सूर लावला. वास्तविक पाहता द्राक्ष, डाळींब, केळी, बोर या पिकांच्या एका एकराची उत्पादनाची किंमत कितीतरी अधिक असते, अशावेळी हे व्यापारी धनादेश द्यायचे.
अनेक शेतकऱ्यांचे धनादेश वठायचेच नाहीत. मग कोर्टात जा किंवा त्या व्यापाऱ्याच्या मागे चकरा मार असे ठरलेले असायचे. या साऱ्या अडचणीच्या बाबी हेरून मिलिंद व नितीन यांनी द्राक्षबागेचे क्षेत्र कमी केले व कमी केलेल्या क्षेत्रातील उत्पादित द्राक्षे व्यापाऱ्याला द्यायची नाहीत, त्याऐवजी स्वतः विकायची हे ठरवले.
हे करताना त्यांनी हवामानाचा अंदाजही घेतला. त्यानुसारच छाटणी व उत्पादनाचे गणित ठरवले. आता गेली पाच वर्षे ते रस्त्यावर आपली द्राक्षे विकतात. अगदी याच वर्षीचे गणित पाहिले, तर त्यांच्या द्राक्षाला व्यापाऱ्याकडे प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळाला असता, मात्र हीच द्राक्षे नंतर बाजारात ६० ते ७० रुपये किलोने विकली गेली असती, मग नितीन व मिलींद यांनी यातून सुवर्णमध्य साधून या द्राक्षाची किंमत ५० रुपये किलो ठेवली.
आता त्यांनी पाच स्टॉल उभे केले आहेत. एक स्टॉल बारामतीतील एमआयडीसी चौकात तर इतर स्टॉल इंदापूर- बारामती राष्ट्रीय महामार्गालगत उभे केले आहेत. दररोज सरासरी १ टन द्राक्षांची विक्री होत होती. आतापर्यंत त्यांनी २२ टन द्राक्षे विकली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत त्यांची उत्पादित द्राक्षे संपतील.
जर मिलींद व नितिन यांनी पिकवलेली द्राक्षे व्यापाऱ्याला २० रुपयांनी दिली असती, तर त्यांना हा ५० रुपयांच्या दरातील फरक मिळालाच नसता.. मात्र ते शेतकरीही बनले आणि विक्रेतेही.. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा.. इथल्या रानोमाळ बहरतील चैतन्याच्या बागा.. चैतन्याच्या बागा आणि आयुष्यात चैतन्य आणणाऱ्या या बळीराजाच्या आयडीयाच्या कल्पनेला महान्यूजचा सलाम..