बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए (सीए) विभागामार्फत एकदिवसीय सायबर सुरक्षा या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील बीबीए, सीए, बीसीएस, बीसीए या विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यशाळेत सायबर एनालिस्ट सुरज लिगाडे यांनी सायबर सुरक्षेबाबत अनेक बाबी प्रात्यक्षिकासह दाखवल्या. सुरक्षित प्रोग्रामिंग कोडींग कसे असावे याचेही महत्त्व सा्ंगितले. या क्षेत्रातील करिअरच्या संधी, इथिकल हॅकिंग, या क्षेत्रातील अनेक पदांबाबत आणि इतर कोर्सेसबद्दल माहिती दिली.
महेश पवार यांनी प्रास्ताविकात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे सायबर सुरक्षितेबाबत जागृती केल्यास होणा-या गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे विविध कोर्सेस करावेत त्याचा त्यांना भविष्यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केल्यामुळे दररोज सायबर गुन्हे घडत आहेत असे मत व्यक्त करून याबाबत विद्यार्थ्यांमार्फत समाजात जागृती व्हावी हा या कार्यशाळेमागील मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या कार्यशाळेत अद्यावत ज्ञान संपादन करून समाजात जागृती निर्माण करावी अशी आशा व्यक्त केली.
या कार्यशाळेतून आमच्या अनेक शंका दूर झाल्या असे तेजल पाटणकर व ऋतुजा पवार या विद्यार्थ्यांनींनी प्रातिनिधीक मनोगतात सांगितले. कार्यशाळेस उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख वक्ते सुरज लिगाडे, महेश पवार, किशोर ढाणे, गौतम कुदळे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे, डॉ.लालासाहेब काशीद यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार विशाल शिंदे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी अनिल काळोखे, सलमा शेख अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर व सतीश चौधर यांनी नियोजन केले.