दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी दांडेघर येथील टेबललॅंडवर दांडेघर येथील जनावरांचा कळप चरत असताना काल १५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वीज कोसळली. वीज कोसळल्याने दोन म्हशी जागीच दगावल्या.
पाचगणी दांडेघर येथील रहिवासी गिताबाई बाळासाहेब राजपुरे या नेहमीप्रमाणे टेबललॅंडवर पाच म्हशी चारण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी जाण्याच्या तयारीत असतानाच आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही कळायच्या आत वीज कोसळली व त्यामध्ये दोन म्हशी सापडल्या. त्या जागीच मृत झाल्या.
त्यावेळी त्याठिकाणी अंदाजे ५० गाई म्हशी चरत होत्या. मात्र हा प्रकार घडताच हा सारा कळप दांडेघर येथील गोठ्याकडे भयभीत होऊन पळाला. त्याचक्षणी विज कोसळली. या घटनेत राजपुरे यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे राजपुरे यांना अश्रू आवरत नव्हते.
गावचे उपसरपंच जनार्दन कळंबे, शरद कळंबे, रमेश वाडकर व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला माहिती कळवली. तहसीलदारांनी या घटनेचा पंचनामा करण्याची सूचना तलाठ्यांना केली, त्यानुसार तलाठ्यांनीही पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर केला.