सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – तालुक्यातील निमगाव केतकी येथे खुलेआम चालू असणा-या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी निमगाव च्या मटका चालकासह 11 जणांवर कारवाई केली. कारवाईत पोलीसांनी रोख रकमेसह 63 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी मटक्याच्या धंद्यावरील ही कारवाई मंगळवारी (दिनांक 14 मार्च) रोजी सायंकाळी 5 वा.40 वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी हद्दीत डोंगरे कॉम्प्लेक्स समोर जालींदर गेणा बारवकर यांचे पत्रा शेडच्या आडोशाला केली. या प्रकरणी हवालदार वैभव साळवे यांनी फिर्याद दिली.
यामध्ये मटका मालक शंकर भिमराव भोंग (रा.निमगाव केतकी ता.इंदापूर) यांचेसह चार बुकी एजंट व सहा मटका खेळणारे अशा 11 जणांवर कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दिनांक 14 रोजी )मटका मालक शंकर भोंग यांच्या सांगणेवरून नारायण गोपाळ बनकर (वय 43 )वर्ष, रणजित लक्ष्मण भोंग (वय 38 वर्ष), रामदास विठठल भोंग (वय 48) तिघेही रा. निमगाव केतकी ता.इंदापूर, कालीदास दत्तात्रय माने (वय 54 ) रा.शेळगाव ता इंदापूर जि. पुणे हे कल्याण जुगार नावाचा मटका खेळत होते.
कल्याण मटका खेळत असताना हनुमंत प्रल्हाद बारवकर ( रा. बारवकार वस्ती, निमगाव केतकी ता इंदापूर जि. पुणे), विलास भानुदास ढावरे (वय 63 रा. वरकटे खुर्द ), मोहन रामचंद्र राउत (वय 45 वर्ष रा. भैरोबाचा मळा, निमगाव केतकी), पांडुरंग गेणबा बरळ (वय 65 रा. व्याहळी), गणपत भानुदास कुंभार (वय 59 रा.कुंभार वस्ती, पिटकेश्वर ता इंदापूर ), रामदास अर्जुन भोंग (वय 50 वर्ष रा.गोतोंडी) आदींवर इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. 331 / 2023 मुंबई जुगार कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाप्यात 21 हजार 180 रुपयांची रोख रक्कम, तसेच टेबल, प्लॅस्टीक खुर्चीसह इतर साहित्य असे 1 हजारांचे सामान, तसेच 20 हजार रुपये किमतीची पांढ-या रंगाची गाडी (नंबर एम एच 42 ए व्ही 1088), तसेच जप्त करण्यात आलेले मोबाईल त्याची 21 हजार 800 रुपयांची किंमत असा एकूण 63,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.