राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : खासदार संजय राऊत यांनी दौंड भाजपचे आमदार आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केलेल्या ५०० कोटींच्या कथित भ्रष्टाचारावर आवाज उठवल्याबद्दल दौंड तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर दौंड शहरासह, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत झळकले आहेत.
राऊत यांच्या आरोपानंतर राज्याचे हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर दौंड तालुक्यातील विरोधकांनी टिकेची झोड उठवली. दुसरीकडे आमदार कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करीत ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो, पुतळ्याचा दहन करून निषेध नोंदवला.
आता त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे फलक सध्या दौंड तालुक्यात झळकले आहेत. राऊत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस सहकार कारखान्यातील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला तोंड फोडले.. मग कर नाही तर डर कशाला? चौकशीला सामोरे जा, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीने जाहीर आभार..! अशा आशयाचे बॅनर शेतकरी सभासदांनी दौंड शहरात ठिकठिकाणी तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लावले आहेत.
एकीकडे आमदार कुल यांच्या समर्थकाकडून खासदार राऊत यांचा निषेध सुरू असताना, दुसरीकडे खासदार राऊत यांच्या आभाराचे बॅनर लागल्याने तालुक्यात भीमा पाटसच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.