विक्रम वरे, बारामती.
बारामतीत दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार असे पवार कुटुंबिय गप्पा मारत असतानाच अजितदादांनी, सुप्रिया सुळे व रोहितदादांनी एक बुके मागवून घेतला आणि स्वप्नील.. अशी हाक मारून त्याला हा बुके दिला.. त्याचे अभिनंदन केले..!

स्वप्नील शिंदेला हा बुके त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला..पण पवार कुटुंबासाठीही स्वप्नीलचे एक महत्व आहे.. कारण तो खास फोटोग्राफर आहे. गेली अनेक वर्षे तो विविध कार्यक्रमांमध्ये फोटो काढतो. ज्याची चर्चा होतेच, एवढेच नाही, तर माध्यमांसाठीही असे खास फोटो पाहिजे असतील, तर स्वप्नीललाच फोन जातो.
हा स्वप्नील शिंदे कोण? तर बारामतीतील एक व्यावसायिक मेहनती युवा फोटोग्राफर.. ज्याच्या आजोबांनी सन १९५२ मध्ये फोटो स्टुडीओ सुरू केला आणि त्याचा वटवृक्ष तिसऱ्या पिढीने गगनावर नेला. आज त्याचा हा फोटो स्टुडीओ फक्त एक फोटो काढायचे दुकान नाही, तर एक प्रतिथयश उलाढाल करणारी एखादी छोटी कंपनीच बनली आहे.
वर्षाकाठी सव्वा ते दीड कोटींची उलाढाल करणाऱ्या त्याच्या व्यवसायाचा प्रवास मात्र खडतर आणि कष्टप्रद आहे. आजही १४-१४ तास तो स्वतःही काम करतो. स्वप्नील आज ३५ वर्षांचा आहे. तो अपघाताने किंवा पारंपारिक व्यवसाय म्हणून या व्यवसायात आलेला नाही. तो छंद होता म्हणून या व्यवसायात आला आणि आज व्यक्तीपासून ते उद्योगापर्यंत वेगवेगळ्या घटकांचे त्यांना हव्या तशा पध्दतीने फोटोग्राफी करतो, म्हणूनच तो औद्योगिक कंपन्या, राजकीय नेते, इव्हेंट, विवाह सोहळ्याचे खास फोटोसाठी त्याला आमंत्रित केले जाते.
सन १९५२ मध्ये बारामतीत के.बी. शिंदे अर्थात किसन बंडोबा शिंदे यांनी फोटो स्टुडीओ सुरू केला आणि त्यांच्या मुलांनीही यात त्यांचाच कित्ता गिरवला. पुढे शाम शिंदे यांनी या शिंदे फोटो स्टुडीओला अधुनिक काळातही जिवंत ठेवले. वैयक्तिक लोकसंपर्क, नव्या काळाची गरज ओळखून लगेच नव्या बदलांना सामोरे जात त्यांनी फोटोग्राफीमध्ये अधुनिक बदल स्विकारले. त्याच बदलाच्या काळात अनेक फोटो स्टुडीओ कालबाह्य झाले. बंद झाले. मात्र शिंदे फोटो स्टुडीओ अनेक स्थित्यंतरातही कायम राहीला.
स्वप्नील हा शिंदेंचा मुलगा.. दहावीत असतानाच त्याने कॅमेरा हातात धरला. त्याला ऑटोमोबाईल इंजिनिअरींगमध्ये करीअर करायचे होते. तसे त्याने ठरवलेही.. पण काळाच्या ओघात कॅमेऱ्याच्या लेन्सने त्याला मोहात पाडले आणि तेथूनच करिअरचा नवा मार्ग त्याने फोटोग्राफीतच शोधला.
१९५२ ते २००२.. तिसऱ्या पिढीने या स्टुडीओची कमान स्विकारण्याचा हा काळ होता. तेथून सन २०२३ पर्यंतच्या काळात या स्टुडीओने कात टाकली आणि मोबाईलमधील कॅमेऱ्याने रोलचे कॅमेरे उध्वस्त केल्यानंतरच्या काळापासून ते आजपर्यंत हा स्टुडीओ अबाधित व काळाच्या पावलाबरोबर ठेवण्याचे काम स्वप्नीलने इमानेइतबारे केले.
आज बारामतीत व्हीआयपी फोटोग्राफीपासून, वेडींग फोटोग्राफी, इंडस्ट्रीयल कर्मशिअल फोटोग्राफी अशा विविध स्तरावरील फोटोग्राफीत स्वप्नीलचा हातखंडा आहे आणि त्यातूनच त्याची ही छोटी स्टुडीओ कंपनी एक ते दीड कोटीपर्यंतची वर्षाकाठी उलाढाल करते.. अर्थात ही उलाढाल देखील आमदार रोहित पवार यांच्या सृजन महोत्सवात स्वप्निलची मुलाखत घेताना माहिती विचारली असता स्वप्नीलने ही माहिती दिली. आणि फोटोग्राफीत कष्ट घेतले तर तो देखील करिअरचा एक मार्ग असू शकतो हे अनेकांना लक्षात आले.
त्याच स्वप्नीलचा अजितदादांनी, रोहितदादांनी अगदी बोलावून सत्कार केला.. अर्थात काही क्षणच.. कॅमेरा बाजूला ठेवून सत्कार स्विकारून हर्षभरीत झालेल्या स्वप्नीलने पुन्हा काही क्षणातच कॅमेरा उचलला आणि आपल्या कामाला सुरवात केली होती..!