सचिन पवार ,महान्युज लाईव्ह
सुपे – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धच्या दुसऱ्या पर्वासाठी आयोजित पाणी फाउंडेशन तर्फे बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सत्यमेव जयते फार्मर कप 2022 पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा रविवारी पार पडला.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाणी फाउंडेशन चे संस्थापक अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पद्मश्री पोपटराव पवार, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून अनेक शेतकरी गट शेतकरी महिला गट उपस्थित होते. या कार्यक्रमात पाणी फाउंडेशन चा राज्यस्तरीय फार्मर कप पुरस्कार 2022 हा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाला देण्यात आला. तर बारामती तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तुकाईदेवी शेतकरी समृद्ध गट नारोळी या गटाला देण्यात आला.
या गटामध्ये ३० सदस्य संख्या होती. शेतकऱ्यांनी या गटामार्फत सोयाबीन पीक यशस्वीरित्या व नियोजन पध्दतीने घेतले. गावातील ९ सदस्यांनी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड यांच्या मार्गदर्शनाखाली समृध्द ग्राम स्पर्धेचे प्रशिक्षण घेऊन गावात गट शेती करायचे ठरवले व सोयाबीन , कांदा , बाजरी असे तीन गट तयार केले, पण पाऊस उशिरा झाल्यामुळे कांदा व बाजरी पेरणी कमी प्रमाणात झाली.
सोयाबीन गटातील ३० सदस्यांनी मिळून ३० एकर पेरणी जुलै महिन्यात केली, बियाणे खरेदी पासून ते मळणी पर्यंत एकत्र काम केले. त्याचा फायदा असा झाला की, शेतकऱ्याचे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली व जी गोष्ट सर्वांना जास्त त्रासदायक होती ती म्हणजे शेत मजुर न मिळणे त्यावर एकत्रित आल्यामुळे एकमेकांच्या शेतात काम ( इर्जिक ) करून ती अडचण दूर केली. त्यामध्ये प्रामुख्याने खुरपणी ,औषध फवारणी ,काढणी , मळणी इत्यादी कामे करण्यात आली.
तसेच सर्व सदस्यांनी मिळून एकात्मिक कीड व्यवस्थापन मध्ये बीजप्रक्रिया, निमअर्क, दशपर्णी अर्क, चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे इत्यादींचा उपयोग केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन सोयाबीन विषमुक्त तपासणीत पात्र ठरले.
गट शेतीमुळे खेळीमेळीच्या वातावरणात काम होत गेले. दर आठ दिवसात शिवार फेरी घेतली. त्यामुळे योग्य वेळी पिकाचे निरीक्षण करून त्यावर उपाययोजना करणे सोपे झाले. हे सर्व पाणी फाउंडेशन आयोजित गट शेती स्पर्धेमुळे शक्य झाले असे मत तुकाई समृद्ध गटाच्या शेतकरी सदस्यांनी व्यक्त केले.